उद्ध्वस्त पहाट....

Started by विक्रांत, July 22, 2017, 08:01:20 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

उद्ध्वस्त पहाट....
***********

तुझ्या दुःखाचे अंगण
सुख मागते अजून
रोप लावली हौसेने
जाती पाचोळा होवून

का ग भोगातेस अशी
व्यथा उजाड रानाची
मनी उभारली गोड
स्वप्ने मुग्ध श्रावणाची

गंध भरता श्वासात
प्राण वेडावती खुळे
याद शोधते अजून
खोल पाताळात मुळे

जीव जगतो एकटा
फांदी जखडल्या गाठी
मुठ रिकामी तरीही
गोष्टी जपल्यात किती

कुणी वेल्हाळ पाखरू
वाट चुकून भेटते
त्याला घरट्याची उब
दूर घेवुनिया जाते

मग निष्पर्ण डोलारा
रात्र राहतो मोजत
अन उजाडते पुन्हा
तीच उद्ध्वस्त पहाट

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/