काही समजत नाही

Started by Asu@16, August 12, 2017, 09:49:54 PM

Previous topic - Next topic

Asu@16

      काही समजत नाही

गुन्हेगार राहती तुरुंगाच्या घरात
की घराच्या तुरुंगात !
तुरुंगाचे झाले घर ,की घराचा तुरुंग ?
डोकं चक्करतं, उमजत नाही
आपल्याला तं बुवा काही समजत नाही

आजचा शत्रू उद्याचा मित्र
की आजचा मित्र उद्याचा शत्रू !
शत्रूचा झाला मित्र ,की मित्राचा शत्रू ?
कशाचाच मेळ बसत नाही
आपल्याला तं बुवा काही समजत नाही

झटक्यात मंत्री आणि फटक्यात संतरी
झटक्यात संतरी आणि फटक्यात मंत्री
मंत्र्याचा झाला संतरी, की, संतऱ्याचा मंत्री ?
अशी कशी असते बाबा लोकशाही
आपल्याला तं बुवा काही समजत नाही

बैलांच्या छावणीत नेत्यांना थारा
नेत्यांच्या दावणीत बैलांचा चारा
नेत्याचा झाला बैल, की बैलांचा नेता ?
फरकच दोघांतला जाणवत नाही
आपल्याला तं बुवा काही समजत नाही

देवीमाता, धरतीमाता, नदीमाता, गोमाता
माता माता माता माता
पिता एक माता अनेक
ऋण फेडावे कुणाचे कळत नाही
आपल्याला तं बुवा काही समजत नाही

खाण्या पिण्या आणि नेसण्याच्या आज्ञा
विनंती समजा, गहाण प्रज्ञा
आज्ञा झाली विनंती, की विनंती झाली आज्ञा ?
खाणे पिणे नेसणेही आपल्या हाती नाही
आपल्याला तं बुवा काही समजत नाही

माणूस जगतो मरण्यासाठी?
की माणूस मरतो जगण्यासाठी
मरून जगावे ,की जगून मरावे ?
काय करावे काहीच ठरत नाही
आपल्याला तं बुवा काही समजत नाही

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita