आठवणीतला गाव

Started by शिवाजी सांगळे, September 26, 2017, 03:28:57 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आठवणीतला गाव

वन आरके, टु आरके, मधेच गुंतली नाती
नाही उरले अंगण, ना अंगणामधली माती !

आजोळही हरवले, न् दुरावला पुराना गाव
पैसे फेकून एन्जॉयतो, मामाचा उसना गाव !

खेड्यांची कशी पहा, होऊ लागलीत शहरे
नात्यांमधे का तशीच, वाढू लागलीत अंतरे !

वैभव दिसेना गावचं, ते अफाट गोधन सारं
गुप्त झालं सुट्टीतल्या, रानमेव्याचं दान सारं !

चौक आला न् गेल्या, चावडीवरच्याच गप्पा
टिव्हीपुढे भजन मुके, मंदिरी एकटाच बाप्पा !

सडका जिंकल्या, हरल्या साऱ्या जुन्या वाटा
दिसेना एखाद बाभळ, पायात मोडण्या काटा !

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९