पाहणे व पाहणारा

Started by विक्रांत, October 08, 2017, 08:29:49 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

पाहणे व पाहणारा

कॉलेज मधील मित्रा सोबत
आपण थोडे चावट असतो
बायकोबरोबर बाजारात
नेहमीचेच बावळट असतो
आवडीचे पदार्थ बनता
भूक नसून हावरट होतो
पण पाहतो आपण आपणास
तेव्हा थेट तेच असतो

तिथे कुणाचा लुड्बुडणारा
ठेवलेला ठपका नसतो
असाच हा आहे म्हणून
कुणी नाक मुरडत नसतो
फार काय सांगू यार
आपण आपणास नवीन असतो

पाहणारा पाहत असतो
भीडभाड ठेवत असतो
आपले सारे शहाणपण
शेणाचा मग गोळा होतो
मोठेपण पदवी बिदवी
पाटीवरचा शब्द उरतो
धन म्हणजे आकडे फक्त
देह ही हा उसना असतो
पाहण्याच्या दारात आपण
हळू हळू विश्वच असतो
उरले मी पण काही तरी
जाणीवेवर तरंग असतो
खोल खोलवर आत केवळ
अटळ अथांग ठाव असतो
मिटण्याची इच्छा असून
मिटायचे राहून जातो
थोडे धुके थोडी हवा
एक हलका मेघ होतो

"किती काळ बसणार ध्यान
लावूनिया तडासन
शब्द काही कानी पडतो ?"

एक पडदा उठतो अन
नव्या नाटकी रंग भरतो

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in