तुझी नि माझी भेट ठरावी,

Started by Swapnil Dhobale, October 19, 2017, 03:09:43 AM

Previous topic - Next topic

Swapnil Dhobale

तुझी नि माझी भेट ठरावी,
तू भेटीची जागा अन वेळ ठरवावी ,
ठरल्याप्रमाणे तू हजर असावीस,
पण मीच नेमका उशीर करावा ,
अन् त्याचाच रुसवा तुझ्या गालावर असावा,
मी येताना मला फुलांचं दुकान दिसावं,
अन् उशिरा येण्याचं कारण असूनही,
मी तुझ्यासाठी एक तरी फुल घ्यावं
अन् कोणीतरी पाहिल म्हणून ,
ते pant च्या खिशात दडवून ठेवावं
मी sorry बोलुनही तुझा राग न जावा,
अन् तो इतक्यात जाणार नाही
हे माहित असूनही मी sorry बोलावं,
मग मी हळुच दडवून ठेवलेलं फुल बाहेर काढावं,
अन् नेमकं ते चुरगळलेलं असावं,
त्या फुलाची अवस्था बघून मलाही लाज वाटावी,
अन् ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्नही करावा ,
तुझा राग सुद्धा त्या फुलाला बघूनच निघून जावा,
अन् गालातल्या गालात तू खुद्कन हसावंस,
तुझं ते हास्य पाहून मला हि हसू यावं,
त्याचवेळी नेमकी पावसाची सर यावी,
अन् नेहमीप्रमाणे मी छत्री विसरलेली असावी,
मीही हक्कानं तुझ्या छत्रीत घुसावं,
मध्येच पावसाची मोठी सर यावी,
अन् हातातली छत्री दोघांसाठी अपुरी पडावी,
भिजू नये म्हणून तुही मला बिलगावं,
थोडा वेळ दोघांनीही गप्प चालत राहावं,
फक्त कोसळणाऱ्या पावसाचा आवाज यावा,
तेवढ्यात बाजुने दोन बायका जाव्यात,
अन् त्यांनीही एक टोमणा मारावा,
तो आपल्यालाला ऐकू यावा,
मी तुझ्याकडे पाहावं,
तू सुद्द्धा लगेच दूर व्हावस्,
अन् छत्री बंद करावीस,
नेमकं त्याच वेळी तुला माझ्या जवळ आणणाऱ्या
पावसानेही हुलकावणी द्यावी,
अर्धवट भिजलेलो आपण असंच चालत राहावं
असंच चालत राहावं हातात हात घेऊन
अन् प्रत्येक गोष्टीला सामोरे जावं
अगदी तसंच जसं,
काही वेळापूर्वी आपण पावसाला सामोरे गेलो होतो, 'एकत्र'....