दुही (दंगल )

Started by विक्रांत, January 06, 2018, 06:47:14 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



विष बीज ते दुहीचे     
खोल मनात रुजले
ओल्या भूमीत नवीन
बळ घेवून उठले 

हाती दगड पेलले   
रान डोळ्यात पेटले
मित्र मनातील सारे
शत्रू क्षणातच झाले 

मत पेटीच्या पिकाचे 
राजे गालात हसले
पडू आलेल्या खुर्चीस
टेकू चार ते लागले

प्रेम हवे जगण्याला
द्वेष हवा असे का रे  ?
भीतीमध्ये गाडलेल्या
भूता मृत्यू नसे का रे  ?

जात धर्म पंथ मग 
वर्ण भाषा वंश आदी
रावणाची मुंडकी ही
नच संपणार कधी !

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in