पारावरची माणसं

Started by Dnyaneshwar Musale, February 23, 2018, 09:00:42 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

दाराशी बांधलेली
दोन चार कणसं,
कौलारू भेंड्याच
एक घर छानसं,
अनं किती जवळची वाटतात
कि नाही पारावर बसलेली
अशी दोन चार माणसं.

गवाणीला आडवी टाकलेली
कुळवाची दांडी,
पाण्यासारखी असणारी
आईस्क्रीमची कांडी,
अनं किती प्रेमळ वाटते,
नातवंडांना मायेची
उशी असलेली
अशी पारावरची बाबाची मांडी.

गावकुसाच्या असणाऱ्या
बारा वाटा,
बेधुंद करणाऱ्या
वाऱ्याच्या लाटा,
खोडा भोवती मुंग्यांनी
केलेला मातीचा साठा,
अनं किती अनुभव
सांगत असतात पारावरच्या
माणसांच्या कपाळावरच्या छटा.

एकदाच गर्दीने भरणारे
सामुदायिक सोहळे,
झुकलेल्या खांदीवर
घर करून राहणारे
मधमाशांचे पोहळे,
उन्हात तापुन
लाल बुंद झालेले डोळ्यांचे गोळे,
अनं किती जवळचे वाटतात
माणसातला माणुसपणा
टिकवणारे पारावरचे चेहरे भोळे.

गावाला गाव पण
देणारी शेती,
सुगंधीत करणारी
काळी माती,
वाऱ्यावर फिरणारी
डोंगरावची पाती,
काबाड कष्ट करून
फुगुन येणारी छाती,
अनं खरचं किती प्रेमाने जपलेली
असतात या पारावरच्या
माणसांनी नाती.