शेतकऱ्याची आखजी

Started by Asu@16, April 18, 2018, 03:58:35 PM

Previous topic - Next topic

Asu@16

दुष्काळाच्या वणव्यात जळणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना, माहेराला आसावलेल्या मुलींना आणि सगळ्यांनाच आखजीच्या शुभेच्छा !

शेतकऱ्याची आखजी

आली आखजी आली
आली दुष्काळ्या पावली
स्थिती अशी केविलवाणी
पिऊ अश्रूंचेच पाणी
सासरच्या रगाड्यात
बाळी माझी पिसावली
माहेरच्या सावलीला
लेक माझी आसावली
लेक माहेरी आणाया
कुणी धाडा रे मुऱ्हाई
चार दिस लाडाचे
भोगू द्या माझ्या बाई
भरा घागर पितरांची
घरी नसेना का दाणा
रीण काढून धन्याचे
तेल तूप घरी आणा
तळा सांजऱ्या करंजा
झोका निंबोणीले बांधा
रोज कोरडी भाकर
आज गोड धोड रांधा
जरा विसरा संसार
घरी गोकुळ भरवा
चार दिस सुखाचे
बाकी आयुष्य वणवा

- अरुण सु.पाटील
 
https://www.facebook.com/AsuChyaKavita