आषाढी एकादशी

Started by Asu@16, July 23, 2018, 01:03:29 AM

Previous topic - Next topic

Asu@16

             आषाढी एकादशी

माऊली आलो माहेरी, मुखे म्हणता हरी हरी
मायबाप तुमचे द्वारी, पंढरी आम्हा पुण्यनगरी             ||धृ||

आषाढी एकादशीचा, दिन आला सोनियाचा
साधुसंत झाले गोळा, विठुरायाचा हा सोहळा              ||१||

एकादशीच्या पवित्र वारी, सजली पंढरपुरनगरी
दिंड्या पताका भरमार, घुमतो विठुरायाचा गजर          ||२||

वारकऱ्यांचा पूर लोटला, चंद्रभागेच्या तीरा
बेहोष नाचती भक्तजन, घोष गेला दिगंतरा                 ||३||

विठू माऊली तुझे राऊळी, उभा आतुर भक्त वृंद
वारकरी आम्ही साधे भोळे, आम्ही ना साधुसंत           ||४||

गळ्यात शोभे तुळशीमाळा, भाळी बुक्का काळा
शिरी वृंदावन डोलती, पाऊले तालात पुढे चालती        ||५||

घुमे टाळ मृदुंगाची धून, लावी ब्रह्मानंदी ध्यान
मन राहिले ना मन आमुचे, झाले विठ्ठलाचे धन           ||६||

साध्या भोळ्या भक्तांचा, कारे पाहशी अंत?
दर्शनासी तुझ्या आलो, देवा व्हावे  कृपावंत               ||७||

नाही कधी चुकली वारी, धावत आलो पंढरपुरी 
एकादशी कडकडीत करी, पूजा तुझी नित्य घरी         ||८||

आम्ही गरीब भक्त देवा, भक्तीभावच आमचा ठेवा
मानून घे आमची सेवा, आता जातो आमच्या गावा      ||९||

प्रा.अरुण सु.पाटील (असु)
   
https://www.facebook.com/AsuChyaKavita