वसुंधरा विवाह

Started by Asu@16, July 23, 2018, 11:24:51 AM

Previous topic - Next topic

Asu@16

    वसुंधरा विवाह

सूर्य बांधता लग्नमंडपी
मंगल तोरण इंद्रधनुचे
निरोप गेला कानोकानी
शुभमंगल आज वसुंधरेचे

सजला मांडव पानाफुलांनी
फेर धरला लता तरूंनी
पक्षी गाती लगीन गाणी
वारा उधळी अत्तर पाणी

सूर्य उगवता जागा झाला
निसर्ग राजा सजला धजला
स्वार होऊन वाऱ्यावरी
वारू निघाला लगीन घरी

धूम धडाम ढोल ताशे
नभ उजळी त्या प्रकाशे
वीज चमकता रोषणाई
नर्तन करिते धुंद पायी

नभी ढगांची लगीन घाई
वरात निघाली दुडक्या पायी
अशी सगळी गडबड घाई
काय करावे उमजत नाही

हिरवा शालू वसू नेसली
हळद उन्हाची अंगी लागली
फुले माळली रंगबिरंगी
नवरी फुलली अंगोअंगी

प्रिया अधीर मधुमिलनाला
मनी आठवी प्रिय सजणाला
येता निसर्ग राजा समोरी
लाजून वसुंधरा गोरीमोरी

लग्न घटिका सिद्ध होता
स्वर्गी बरसल्या जलाक्षता
ताशा ढगांचा कडाडला
वीज लागली नाचायला

असा सोहळा सुंदर सजला
निसर्ग सर्वांगी खूप भिजला
सांजे कन्या पाठवणी होता
सूर्य रडून लाल झाला

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)

https://www.facebook.com/AsuChyaKavita