नाते -स्त्री जीवन आणि भात लावणीचे

Started by Manasi Bhide, July 26, 2018, 09:48:32 PM

Previous topic - Next topic

Manasi Bhide

भरल्या आभाळाचा , रिमझिम पावसाचा
शेतकऱ्याच्या कष्टाचा , काळ भातलावणीचा.

मायाळू लाल माती , पावसाने सुखावते
जणू आईच्या मायेने , तान्ह बियाणं जपते .
रोपे वाढीस लागती वाऱ्यासंगे ती डोलती
त्यांच्या कांतीची झळाळी जणू पाचू ओशाळती.

साद येई नव्या मातीची , स्वप्ने आभाळी जाण्याची
जणू ठाऊक साऱ्यांना , आली वेळ निरोपाची.
होई शिंपण कष्टाची , 
अन् कृपा देवाजीची
वेळ सुगीच्या सुखाची, जणू दृष्ट काढण्याची .

असे नाळ जुळलेली बाईसंगे या भाताची
बिया माहेरी रुजती,
रोपे सासरी नांदती.
नाते दोघांचे जपण्या,
रीत ओटी भरण्याची
म्हणून बाईच्या कुशीत, आहे ओटी तांदळाची .

मानसी भिडे.