...त्यांना सलाम!

Started by gaurig, February 15, 2010, 02:29:49 PM

Previous topic - Next topic

gaurig

...त्यांना सलाम!
                                                                भावना श्रीकांत खिस्ती, कोथरूड.
देशाबद्दल अभिमान बाळगणारे खूप असतात; पण देशासाठी आपला प्राण गमावणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. प्रत्येक आई आपल्या मुलाला लहानपणी शिवाजीच्या आणि राणा प्रतापसारख्या शूर राजाच्या गोष्टी सांगते. थोडक्‍यात, त्यांच्या पराक्रमाचे बाळकडू ती त्यांना देत असते; पण हीच मुले जेव्हा मोठी झाल्यावर खरोखरच देशाच्या सेवेसाठी जाण्याचा हट्ट करतात, तेव्हा मात्र त्या जिजाईमधील एका व्यवहारी आईचे आपल्याला दर्शन होते; पण त्याच मुलाला जेव्हा अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची संधी मिळते, तेव्हा मात्र त्या आईचा आनंद गगनात मावेनासा होतो. मग त्या मुलाला अमेरिकेतील बॉंबब्लास्टमध्ये मरण आले तरी चालेल! हीच माता आता असा विचार करू लागते, की शिवाजी जन्मावा; पण तो शेजारच्या घरात! खरेच एका दृष्टीने विचार केला, तर ते आपल्यालाही पटेल. का बरे जन्मावा शिवाजी आपल्या घरात? काय मिळते त्या जिजाईला? काय करतो आपला देश तिच्यासाठी? जिजाईसारख्या आदर्श माता आणि शिवाजीसारखे आदर्श वीरपुरुष आजही आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर 26 नोव्हेंबरच्या मुंबई येथील हल्ल्यात मारले गेलेले मेजर संदीप उन्नीकृष्णन किंवा कारगिलमधील युद्धात मारले गेलेले लेफ्टनंट मनोज पांडे! अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले, तर परवाच्या गुलमर्ग येथील हिमवादळाने गेलेले आपले जवान आणि एक ऑफिसर प्रतीक पुणतांबेकर. तेवीस वर्षांच्या या कोवळ्या मुलाने पुण्यातील "एनडीए'तून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने डेहराडूनमधील "आयएमए'मधून पदवी प्राप्त केली. नुकत्याच लेफ्टनंट झालेल्या या कोवळ्या मुलाला आपली पराक्रमी कारकीर्द सुरू व्हायच्या आधीच त्याला मरण आले. खरोखर काय परिस्थिती असेल त्या जवानाच्या घरी? कसे आयुष्य जगावे त्या आई-वडिलांनी? पण आपल्याला झालेले हे दुःख त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीबरोबरच वाहू
न जाते.

आपल्या देशातल्या लोकांना दुःख होते ते भारत देश क्रिकेटची मॅच हरल्यानंतर किंवा सचिन तेंडुलकरने त्याचे शतक गमावल्यानंतर. किंबहुना प्रसारमाध्यमांकडून या बातमीचीही तेवढीच दखल घेतली जाते व त्याला प्रसिद्धीपण दिली जाते. हे बघितले, की खरोखरच मन सुन्न होते आणि वाटते की द्यावा भारतासाठी आपल्या मुलाने जीव? आपण ज्यांच्या जिवावर शांतपणे झोपू शकतो ते जवान कसे जगत असतील त्यांचे खडतर जीवन? कधी निसर्गाशी झुंज देत, तर कधी अतिरेक्‍यांशी झुंज देत. काय मिळते त्यांच्या माता-पित्यांना? कालांतराने जगाच्या आठवणीतून हे कायमचे निघून जाते; पण त्या आई-वडिलांना मात्र त्या आठवणीतच कायमचे राहावे लागते. अशा वीर माता-पित्यांना आणि त्यांच्या वीरपुत्रांना माझा सलाम!