झाडाचा खून

Started by Asu@16, August 09, 2018, 05:50:19 PM

Previous topic - Next topic

Asu@16

आज दिनांक 9 ऑगस्ट 2018 या क्रांतिदिनी झालेल्या महाराष्ट्र बंद मध्ये हिंगोलीत आंदोलकांनी मोठे झाड करवतीने कापून रस्त्यात आडवे पाडून रस्ता बंद केला व जल्लोष केला.
एका सळसळत्या झाडाचा झालेला खून पाहून मनाचा झालेला आक्रोश म्हणजे ही कविता-----

      झाडाचा खून


हिरव्या शेती रस्त्याकाठी
हसत खिदळत वाऱ्यापाठी
उभा मस्त जगण्यासाठी

पक्षीगणांना दिला आसरा
वाटसरूंना दिला सहारा
दिली सावली गाय वासरा

अतर्क्य अचानक घडले
माणसांचे वादळ आले
रस्ता बंद आंदोलन झाले

सडक्या डोकी युक्ती सुचली
परोपकाराची अद्दल घडली
करवतीने मज कापून नाचली

करऽकरत मी प्राण सोडला
मुडदा रस्ती आडवा पडला
रस्ता बंद यशस्वी झाला

आंदोलकांनी जल्लोष केला
मृत्यू माझा साजरा झाला
निसर्गराजा मनी खंतला

खुंट अजुनि हा उभा बाजूला
थडग्यासम जना भासला
पाहून पांथस्थ मनी हिरमुसला

बुद्धी का ही अशा मानवा?
झाडे तोडुनि क्रांती घडवा
मरणाचा का हा मार्ग नवा?

विनवणी माझी इतुकी देवा
रस्ता बंदचा हा मार्ग नवा
रस्तोरस्ती ना सदा घडावा

-प्रा.अरुण सु. पाटील (असु)
(09.08.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita