अवताराची कहाणी

Started by Asu@16, August 20, 2018, 08:14:12 PM

Previous topic - Next topic

Asu@16

प्रस्तावना -
नुकतीच एक बातमी वाचनात आली की, एक केंद्रीय मंत्री नियोजित बैठक अचानक रद्द करून ते एका बाबांचे दर्शन घेण्यासाठी निघून गेले.
कुणी कुणापुढे लोटांगण घालावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरीही, एका प्रख्यात व्यक्तीच्या बाबतीत असे घडलं की, त्याच्या प्रसिद्धीच्या वलयाने अंधश्रद्धेला खतपाणी मिळतं हे अशा नेत्यांच्या लक्षात येत नाही का ? अशामुळेच या 'बाबा' लोकांचे अवतारी पुरुष बनतात व भोळ्या जनतेची सर्वप्रकारे लूट करतात.
या प्रसंगाच्या निमित्ताने कल्पनेची भरारी -

                 अवताराची कहाणी

भगवी कफनी लांब दाढी, केशर गंध भव्य कपाळी
देव प्रतिमा भगवी झंडी, पूजाअर्चा सांज सकाळी

बेकार बाबा येऊन बसला, नाही पुसले तयास कोणी
बसणे निजणे तरुतळी, तल्लीन होऊन गाई गाणी

कुतूहलाने दोन जमले, दोनाचे मग चार जाहले
रिकामपणची सोय झाली, गुरु भजनी सारे रमले

पुढारी एकदा रस्त्या आला, दैवे गाडी पंक्चर झाली
उन्हात पाहून थंड सावली, पुढारी आले झाडाखाली

मोका साधून बाबांनी, पुढाऱ्याहाती प्रसाद दिला
अंधारकुटीत प्रकाश आला, मंदिराचा उद्धार झाला

लोटांगण पाहून नेत्याचे, भक्तगण अमाप जमला
चरणधूळ ना मिळे कुणा, जगत्गुरू जगी अवतरला

वोट बँक मिळवून नेता, भरभर भरभर मंत्री झाला
आशिर्वाद देऊन एकमेकां, उभयतांंचा उद्धार झाला

देवाचा अवतार जन्मला, जनां पुजण्या देव मिळाला
खुळी जनता लागे नांदी, भगवानांची झाली चांदी

अवताराची अजब कहाणी, घडते आजही क्षणोक्षणी
देवाची ही अगाध माया, जय देवा जय मंत्रीमहोदया

बाबाजींचा होता देव, पुढाऱ्यास मिळे मंत्र्याची ठेव
झाडाखाली मंदीर वा ऽ रे, वंदन करूया आपण सारे

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
(19.08.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita