सखी उबदार तुझे मायेचे घरटे

Started by lanke.amol, October 01, 2018, 09:48:05 PM

Previous topic - Next topic

lanke.amol


पार्श्वभूमी: एक जोडपे लग्न होण्याआधी काही कारणांनी वेगळे होते. चूक दोघांची नसते नियतीची असते। दोघेही वेगळ्या व्यक्ती सोबत लग्न करतात, अनेक वर्षांनी त्या मुलीला काही कारणांनी असे वाटते की तिचा जुना मित्र तिला ज्यास्ती चांगले समजून घेऊ शकत होता, नवरा काही मित्र होऊ शकला नाही, तिला राहवत नाही ती त्या मुलाला फोन करते, भावनांचा दोन्ही किनारी महापूर होतो, शेवटी मुलगा तिला समजावतो की आयुष्य कधीकधी आपल्या हातात नसते, असण्यात सुख मानावे। हे काव्य त्या मुलाने समजूत काढण्यासाठी केले असते, मुलीच्या मनाची घालमेल तिच्या भावना टिपण्याचा हा एक काव्यरूपी प्रयत्न।



"सखी उबदार तुझे मायेची घरटे"

जुन्या आठवणींच्या गावात मन एक दिवस नकळत वळाले,
निसटून गेले होते काही जुने हातातून तेव्हा मनाला कळाले।

सगळं आता असतं नवं, नवे आयुष्य, नवी स्वप्न, हा प्रवास वेगळाच रंजक असतो,
गर्दीत नवीन शहराच्या केव्हातरी आपले मन मोकळे करून बोलावे असा मात्र कोणी नसतो।

जुन्या गप्पा, त्या खोड्या, ते रागावणे, गझल, रात्रीचा चहा, आठवतात ते सारे किस्से,
वर्तमानात आता मी उगाच शोधु पहाते नवीन चेहऱ्यांमध्ये भूतकाळातील हिस्से।

सगळे विचार,सवयी, सर्व छंद क्वचीत जुळतात दोन लोकांचे,पण मती मनाचे न ऐकता मृगजळाला मोहते,
येतो आज देखील श्रावण व सुंदर वर्षा ऋतू पण पाण्यावर चालणारे निरागस गलबत अश्रूंवर पोहते।

निवडलेल्या वाटेवर आता चालून पांथस्थ आला असतो दूर,
काळजामध्ये तरी का उठते केव्हातरी जुन्या आठवणींची हुरहूर।

शेवटी एकच येतो विचार की ठेवाव्या त्या आठवणी निश्चितच जपून,
पण परिकथेतच येऊ शकते एकाच वेळी अल्हादकरी पाऊस आणि निरागस ऊन।

लागेबंध आणि पाश तोडून कधीच तुटत नसतात, पण नवे निश्चित निर्माण करता येतात,
सांभाळायचे असेल जर आता नवे सारे, तर हमखास एवढे असते आपल्या हातात।

जे विधिलिखित असते त्याला बदलण्याचा करू नये अट्टहास,
येणाऱ्या भविष्यकाळात नक्कीच वाढून ठेवले असेल प्रारब्धामुळे खास।

समजुतदार होईल मन काही वर्षांनी, तेव्हा देखील अवचित जुन्या गावात वळेल,
पण उबदार असेल तेव्हा मायेचे घरटे आणि त्याच्या ओढीने परतीच्या प्रवासात पळेल।

-अमोल लंके