म्हटलं बाप लिहून जावं....

Started by Lalit Patil Sunodekar, October 02, 2018, 11:15:48 AM

Previous topic - Next topic

Lalit Patil Sunodekar

माय लिहली,
जाता जाता म्हटलं बाप लिहून जावं....

केळीच्या खोळाला छाटतांना,
मायेचं हात कापणं लिहलं,
त्या खोळाला जमिनीतून काढतांना,
बापाच्या आतड्यांबद्दल लिहणं मात्र राहून गेलं,
माय लिहली,
जाता जाता म्हटलं बाप लिहून जावं....

ऊसाची पेंडी डोक्यावर वाहतांना,
मायेच्या निघणार्या घामाबद्दल लिहलं,
ऊसाच्या पत्तीने काढलेल्या,
बापाच्या अंगावरच्या रक्ताबद्दल लिहणं माञ राहून गेलं,
माय लिहली,
जाता जाता म्हटलं बाप लिहून जावं....

कॉलेजच्या फी साठी,
भिशी काढणारी माय लिहली,
शाळेतलं पहिलं दप्तर घेण्यासाठी,
मालकाच्या घराच्या फेर्या मारणार्या,
बापाबद्दल लिहणं माञ राहून गेलं,
माय लिहली,
जाता जाता म्हटलं बाप लिहून जावं....

मैलभर चालून डोक्यावर पाणी आणणार्या मायबद्दल लिहलं,
रानात डोक्याला हात लावून आभाळाकडे बघत,
बापाच्या डोळ्यातून निघणार्या पाण्याबद्दल लिहणं माञ राहून गेलं,
माय लिहली,
जाता जाता म्हटलं बाप लिहून जावं....

                                  -ललित पाटील सुनोदेकर-