माळरान

Started by Dnyaneshwar Musale, November 26, 2018, 09:33:42 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

माळरान

तहान लागलीय म्हणूनचं
आज शोध घेतोय
गावकुसाच्या नाल्याच्या झऱ्याचा,
पण त्याचाच  घसा कोरडा असताना
तो ही  कसा देईल मला आधार डेऱ्याचा.

आज तो ही माझ्यासारखाचाच तहानलेला,
डोळे उंचावून बघत राहतो आभाळाकडे.
आसडत असेल बहुदा मलाच  शिव्या
आणि म्हणत असेल,
आता जा नासधूस करणाऱ्या
तुझ्या घरातल्या त्या नळाकडे.

तितक्यातच
सर कन एखादी वाऱ्याची झुळूक येऊन जाते
भरून आलेलं आभाळ स्वतःत सामावुन
भुर्रकन निघून जाते,
पुन्हा सारं मोकळं रान आहे तस तापत राहतं.

शेजारीच मांडीला लागतील अशी ज्वारीची रानं
पोरकी होऊन निपचित गळा दाबून आहेत उभी,
माळावरची रानफुले ही दिसतात तहानलेली
हसत हसत मुठीत दाबुन स्वतःचीच छबी.

येटाळणीला आलेली कणसंही
बसल्यात मानमोडून,
त्यांना वाटतं यावं कुणीतरी अन
घ्यावं खुडून
करणार तरी काय नुसत्याच बनग्या
वरबाडून.

गावगाडा चालवणारी पारावरची
माणसं सगळं दिसत असलं तरी
जवळ करत
नाही पारावरच्या खोडाला,
म्हणे एकदा गावगुंड आला होता तिथं
निवडणुकीच्या काळात
तोच पोखरून गेलाय सावली देण्याऱ्या झाडाला.

गावातील शिकलेली उलशिक पोरं
ते ही जातात गुरं वळायला,
पाऊस ना पाणी म्हणुन
ते ही हळु हळु शहराकडे लागलेत पळायला.

मी अजुन मात्र तिथंच आहे
बघतोय वाट,
पुन्हा एकदा ढग गरजतील,
मातीत
मिसळुन सोन्याच्या धारा
पुन्हा एकदा बरसतील.