विसरत चाललोय

Started by Dnyaneshwar Musale, November 26, 2018, 09:36:19 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

विसरत चाललोय
त्या चिंचेच्या झाडावरच्या झोक्याला,
अनं गोधडीच्या मुलायम टाक्याला.

विसरत चाललोय
सायकलवर दमून खमुन
येणाऱ्या पोस्टमनच्या पत्राला,
अनं पारावर बसुन जगफिरविणाऱ्या खबरी मित्राला.

विसरत चाललोय
चुलीवरच्या काळपट बत्तीला,
अनं बाळा लई गुणाचा हाय,
म्हणत हाक मारणाऱ्या चुलत निलत आत्तीला.

विसरत चाललोय
माळावरच्या गुरा ढोरांना,
अनं डोळे बांधून कोशिंबीर खेळणाऱ्या बारक्या पोरांना.

विसरत चाललोय
काबाड कष्ट करून पिकणाऱ्या शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या मालाला,
अनं भोक पडलेल्या आठवडे बाजारातील गरिबी झाकणाऱ्या पालाला.

विसरत चाललोय
मावशी काका काकु अप्पा तात्या
म्हणून हाक मारायला,
अन माणुसकीच बीज नव्यानं पेरायला.

खरचं विसरत चाललोय की काय,
माणसाशीच माणुस म्हणून वागायला,
अनं
स्वतःच माणुस होऊन जगायला.