विटाळ किटाळ

Started by शिवाजी सांगळे, April 09, 2019, 12:19:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

विटाळ किटाळ

स्री देही बदल होणे, किमया ही ऋतूचक्राची
नाही कसला विटाळ, हाक जाणा निसर्गाची !!धृ!!

स्त्री देही दु:ख वेदना, भोगते रात्रंदिवस चार
संगती थकवा, ग्लानी, सामाजिक तिरस्कार
सर्वांसी भान असावे, व्यथा ना कुणा एकीची
युगे युगे घडते आहे, कथा ही स्त्री जन्माची !!१!!

स्री देही बदल होणे, किमया ही ऋतूचक्राची
नाही कसला विटाळ, हाक जाणा निसर्गाची !!धृ!!

आहे ना देणं देवाजीचंं, लिंग, रूप, रंग सारं
माणूस म्हणून जगण्या, मोका जरा द्या बरं
माता, भगिनी, लेक, जाणावी बुज नात्यांची?
विटाळ किटाळ म्हणता, ओढता री परंपरेची !!२!!

स्री देही बदल होणे, किमया ही ऋतूचक्राची
नाही कसला विटाळ, हाक जाणा निसर्गाची !!धृ!!

शिवला कावळा तुला, बस लांब तिकडं दूर
राहिले अज्ञानी सारे, पाळूनी गैरसमज फार
हाडमास देह सगळा, अमर काया कोणाची?
जी गत माझी होणार, तीच तऱ्हा सगळ्यांची !!३!!

स्री देही बदल होणे, किमया ही ऋतूचक्राची
नाही कसला विटाळ, हाक जाणा निसर्गाची !!धृ!!

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९