बालपण

Started by Mahesh Thite, May 27, 2019, 10:40:37 PM

Previous topic - Next topic

Mahesh Thite

                         बालपण

एक दिवस देवानं मला अचानक दर्शन दिलं,
दर्शन देवून मला, वरदान मागाया सांगितलं,
क्षणभर मन जरासं गोंधळून गेलं,
विचार करून थोडासा, मी वरदान मागितलं,
म्हटलं,

देवा देत आलं तर पुन्हा मला बालपण दे,
ते दिवस जगण्याची परत एक संधी दे।

दे मला पुन्हा ते निरागस हसणं,
थोडासा राग आल्यावर, कोपऱ्यात रुसून बसणं,

शाळेच्या पहिल्या दिवसाची वाट पाहणं,
नवीन गणवेशासाठी बाबांकडे हट्ट करणं,

शाळेत पहिली जागा पकडण्यासाठी धडपड करणं,
दोन जणांच्या बाकावर तिघांनी बसणं,

एकच चॉकलेट चौघांनी, दातांनी फोडून खाणं,
चिंचेच्या बुटुकासाठी झाडं हुडकनं,

शाळा बुडवण्यासाठी नवीन कारणं शोधणं,
पाठीतील धपाटे टाळण्यासाठी शिक्षकांना पटवून सांगणं,

लुटुपूटुच्या भांडणात कट्टी बुट्टी करणं,
राग ओसरल्यावर पुन्हा दोन बोटांनी सोय घेणं,

आंबे तोडायला झाडावर उंचच उंच चढणं,
उन्हातान्हात अनवाणी मनसोक्त बागडणं,

पावसात शाळेतून येताना मनसोक्त भिजणं,
मुद्दामहून चिखलात पाय घसरून पडणं,

स्वातंत्र्यदिनाची भाषणं दोन दोन दिवस पाठ करणं,
इस्त्रीचे कपडे, डोक्यावर टोपी घालून झेंडावंदनाला जाणं,

पंचतंत्राच्या गोष्टीत हरवून जाणं,
बोट वर करून शक्तिमानसारखं फिरणं,

ते दिवस आठवल्यावर कधी कधी हसू येतं,
ते दिवस आठवल्यावर कधी कधी रडू येतं,

देवा देता आलं तर पुन्हा मला बालपण दे,
जीवनाच्या धडपडीत पुन्हा मोकळा श्वास दे,

माझं कथाकथन ऐकून देव गालात हसला,
तथास्तु म्हणणार, इतक्यात गजरानं घोळ घातला,
उघडणाऱ्या डोळ्यांसोबत बालपण मागे पडलं,
बालपण पुन्हा जगण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं।।

                                       -- महेश थिटे,
                                             अहमदनगर