पहिला पाऊस

Started by Mahesh Thite, June 03, 2019, 11:43:08 PM

Previous topic - Next topic

Mahesh Thite

     पहिला पाऊस

शिट्टी वाजवत वाऱ्याने,
तुझ्या आगमनाची वर्दी दिली
शुभ्र त्या पाखरांची,
आसमंतात गर्दी झाली
तुझ्या आगमनाच्या चाहुलीने,
सारी सृष्टी हरखून गेली
तुझी गळा भेट घेण्या,
वसुंधरा ही अधिर झाली ।।

सावळ्या मेघांच्या दर्शनाने,
झाडांची पाने टवकारली
वाऱ्याच्या तालावरती,
टाळ मृदंग वाजवू लागली
कोकिळेच्या स्वागतगीताने,
आणखी शोभा आणली
तुझी गळा भेट घेण्या,
वसुंधरा ही अधिर झाली ।।

प्रथम स्पर्श होता तुझा,
धरा ही शहारून गेली
ओशाळून थोडसं,
हिरवी शाल पांघरली
वर्षभराची तपश्चर्या,
आज फळासी आली
तुझी गळा भेट घेऊन,
वसुंधरा ही तृप्त झाली ।।

                --महेश थिटे,
                    अहमदनगर