पूरग्रस्ताची कैफियत

Started by Mahesh Thite, August 14, 2019, 03:43:49 PM

Previous topic - Next topic

Mahesh Thite

             पूरग्रस्ताची कैफियत

जीवनदायी जीवन
जीवनदाहक ठरलं,
निर्दयी पावसाच्या साथीनं
तू सारं काही नेलं ।।

पाऊसही हट्टी कसा
खोडसाळवानी वागला,
तुझी साथ देऊन
आमचा बट्ट्याबोळ केला।
आधी पाण्यावाचून होरपळवलं
आता पाण्यात बुडवून मारलं,
निर्दयी पावसाच्या साथीनं
तू सारं काही नेलं ।।

पाझरणाऱ्या हृदयाची तुझ्या
शिळा कशी बनली,
लहान लहान लेकरं
आईपासून तोडली।
माणसांना लुटलंच गं
मुक्या जीवांनाही मारलं,
निर्दयी पावसाच्या साथीनं
तू सारं काही नेलं ।।

संसार सारा उजाड झाला
सारं काही संपलं,
वाढणाऱ्या पाण्यासोबत
हृदयाचं पाणी झालं।
महापुराच्या लढाईत
जीवनाचं पानिपत झालं,
निर्दयी पावसाच्या साथीनं
तू सारं काही नेलं ।।

           -- महेश थिटे,
               अहमदनगर