पैठणी

Started by Punarvasu Bleeds, October 15, 2019, 05:01:40 PM

Previous topic - Next topic

Punarvasu Bleeds

धावत्या ट्रकवरून लांब हात केलेल्या बाभळीच्या लबाड काट्यावर
कापूस वेचला जावा,
तशी माझी आई अडकली
तिच्या नशिबात.

एक-एक करून एकूणएक धागा ओरबाडून
पुन्हा रचली तिला
त्या चरख्यानं
भामटा स्वार्थी निर्दयी.

हवी तशी
फुलहाराचा दोर म्हणून
मोत्याची तार म्हणून
मिरवायची जर म्हणून
वागवली तिला त्यानं; पिंजून काढलं
पुन्हा-पुन्हा
इतकं की रोग लागले तिला
कित्येक
आणि तिथेही तो तयारच होता,
शिव्यांच्या लाखोलीसह
तिला, तिच्या झाडाला, तिच्या मातीला,
कश्शा कश्शाला सोडलं नाही त्यानं.

मग मळमटलेल्या त्या वातेला टाकली समईत
लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून,
आणि नंतर झोडून काढली तिला
झाडणीने.

त्याला जेव्हा जेव्हा काटा रुतला,
त्यानं तिला पुढे केली
अन् फेकली लगेच कचऱ्यात.
त्याला कधी उमगलंच नाही,
त्याची लक्ष्मी का नि कुठे गेली...
असो.

त्या दोरीत ओवलेलं फूल,
त्या माईचं पहिलं मूल,
त्या जरीनं विणलेला एकुलता एक मोर
पसरतोय त्याची पानं
तिची सावली होऊ पाहतोय
आणि ती
त्याच्या फक्त असण्यानंच स्वतःला समजते श्रीमंत
पैठणीसारखी.