तू भेटलास.. आणि मी चुकले..

Started by Falguni Dhumale, March 16, 2020, 11:51:04 AM

Previous topic - Next topic

Falguni Dhumale

शांत वाहणाऱ्या वाऱ्याचे, वादळात रूपांतर झाले..
जमिनीवरील धुळीचे कण, थेट आकाशाला जाऊन भिडले..
उडणारे पक्षी, परतीच्या वाटेवर लागले ..
आकाश जणू सैरावैरा पळत सुटले..
अचानकच, सगळे वातावरणाचे रंग बदलले ..
दुसऱ्याच क्षणी, पावसाच्या थेंबांनी जमिनीला स्पर्श केले..
आता तिला सुद्धा, पावसात विलीन होणेच योग्य वाटले..
आणि...
माझ्या चेहऱ्यावरून पावसाचे थेंब घरंगळायला लागले...
हाथ पसरवून, मिठी मारून, अंग ओले चिंब झाले..
बेधुंद होऊन, पावसाशी गप्पा मारण्यात मी दंग राहिले..
तेव्हाच..
अडखलेल्या आवाजातून काही शब्द उमटले..
कशी आहेस? एवढे बोलून थांबले,
मी कुतूहलाने वळून बघितले,
बघताच माझ्या नजरेनी त्याला संपूर्ण न्याहाळले..
वाटले, एवढ्या दिवसात काहीच नव्हते बदलले..
तू ? म्हणत माझे मन खुशीने नाचायला लागले..
पण चेहऱ्यावर काहीही न दाखवता, मी स्वतःला आवरले..
जाताना थांबवता आले नाही, या विचारात एवढे वर्ष निघून गेले..
छान, पण तू? आज,असा, इथे, कसा ? केव्हा? सर्व प्रश्न एकाच दाटीने आले ..
पण मी, मी छान.. एवढेच उच्चारले..

परत नीटनेटक्या आयुष्यात, वादळ आपलेसे वाटायला लागले ..
मनाचे आवाज थेट कानापर्यंत पोहोचायला लागले..
तो चेहरा.. ते ओठ.. ते केस.. हळूच लाजायला लागले..
अनोळखी वाटेवर नको-नकोते स्वप्न येरझारा घालायला लागले..
पाऊस, झाडे, फुले, वेली.. माझी खिल्ली उडवायला लागले..
तो आज इथे, असा माझ्यासाठी आला का? या नजरेनी त्याला बघितले..
त्याच्या डोळ्यातील ते भाव, परत मला त्याच्याकडे खेचायला लागले..
हे स्वप्न असू नये, असे सारखे वाटायला लागले..
आता याला कायमचे थांबवून घ्यावे, असे विचार माझ्या मनात फिरू लागले..
माझ्या विचारांच्या धाग्याला तोडत, 'मी निघतोय' हे शब्द माझ्या कानावर पडले..
'अच्छा' म्हणत मी मनातील आसवांना आवरायला लागले..
'नको ना जाऊस' म्हणून, त्याला थांबवू पण नाही शकले..
त्याच्या गोष्टीत, मी कधीच, केव्हाच, कुठेच नव्हते, याचे भान त्याने मला आणून दिले..

एका क्षणात खूप काही बदलून गेले..
आता पावसाचे थेंब नकोसे वाटायला लागले..
डोळ्यातील अश्रू पावसाशी विलीन होऊन गेले..
पण निदान, तो आला.. छान वाटले..
त्या काही सेकंदाच्या खुशीसाठी, मी पूर्ण आयुष्य पणाला लावले..
त्याला जिंकवण्याच्या खुशीत, मी पुन्हा पुन्हा हरले..
त्याला शोधण्यात, मी स्वतःला हरवले..
त्याच्याकडे बघून, मी स्वतःला विसरले..

खरंच.. तू भेटलास.. आणि मी चुकले..


- फाल्गुनी