माझा मी समर्थ

Started by sachinikam, March 19, 2020, 04:24:47 PM

Previous topic - Next topic

sachinikam

माझा मी समर्थ

(कवितासंग्रह: मुकुटपीस, कवी: सचिन निकम, Skrinz Studios)

नाही पसंत मला जगणे
कुंडीतल्या झाडासारखे
घोटभर पाणी पिऊन
वीतभर मान डोकावने.

कुठल्यातरी बंदीस्त बाल्कनीत
अथवा छताच्या सावलीत
शोभेची वस्तू म्हणून
नाही घुसमटायचे मला
कुंडीतल्या झाडासारखे.

त्यापेक्षा...

खोलवर रुजून भुईत
गवसणी घालीन आकाशाला
रखरखत्या उन्हात तिष्ठेन
माळरानी बांधाला.

माझे मी शोधेन पाणी
वा आर्द्रतेवरही जगेन
डोक्यावर सूर्य घेऊन
वाऱ्यासंगे नाचेन.

वाटाड्याला देईन सावली
पशूपक्ष्यांना आसरा
पाने फुले फळे वाटीन
घेऊन चेहरा हसरा.

मोकळा श्वास घेईल मोकळे मन
माझा मी समर्थ ना कसले बंधन.