Pokal paddhat

Started by Monika Bhawar, May 14, 2020, 11:52:40 PM

Previous topic - Next topic

Monika Bhawar

पोकळ पद्धत

का कधी कुणास ठाऊक हे नियम केले कुणी.
पद्धत म्हणून माथी पाडले पिढ्यान् पिढी .
मुलगा आणि मुलगी घेई जन्म
एकाच आईच्या पोटी,
पण मुलगा राही माय घरी
तर मुलगी जाई दुसऱ्या दारी.

आनंद घेऊन येई ती पण इवल्याश्या पावलांनी
लोक म्हणे तिला आहे परक्याची धन ही.
विचार येई जेव्हा पुढचा, आई बापाच्या मनी
हळुवार भिजे पापण्या, येई डोळा पाणी.

लहानपणी....
बापाच्या पाठीचा घोडा करून
लेक ही फिरे तिच्या माय दरबारी.
पण सर्व तिथंच विसरून
मुलीनाच का जावे लागे सासरी.

एकदाची ती होई मोठी,
सासरी ती जाई.
पदरी पडती अनेक नाती
कुणाची बायको, कुणाची सून,
तर वाहिनी कुणाची.

नवीन नाती जुळून घेऊन
जुने थोडे मागे सारी.
हळू हळू त्यांना आपले करुनी
तीही त्यांचीच होऊन जाई.

माहेरी कधी ती जाई मुक्कामी
सर्वच तिला प्रश्न करी
किती दिवसांचा मुक्काम तुझा
जाशील कधी परतून सासरी.

प्रश्न ऐकून वाईट वाटे
आपल्याच जन्म घरी राही दिवस मोजूनी.
दिवस निघून जाई हे सवय करीत
काय करणार....
पुन्हा ती पद्धत, पुन्हा ती रीत.

ओढ लागून राही तिला दोन्ही घरची,
ह्या घरची कि त्या घरची
नक्की कोण तिचा वाली.

कुण्या माणसानेच असावेत हे नियम आखले
असे करणार नाही कुठली बाई
आपलीच मानसं सोडण्याचा नियम
का करेल कुठली आई.

बहुतेक त्या माणसाला मुलगी नसावी,
मुलीच्या वेड्या मायेची जाण नसावी
ज्याने हे नियम केले, केल्या ह्या रीती
ह्यात नाही बदल कुठलाच
असो कुठला हि धर्म...कुठली हि जाती.


                                   मोनिका भवार