जीवन हे एक कोडं

Started by Shubhangi Gaikwad, May 15, 2020, 10:14:57 AM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

कोणास वाटे जीवन जणू खळखळ वाहणारा निर्झरा
तर कोणास भासे जीवन खवळलेली नदी ब्रह्मपूत्रा

कोणास वाटे जीवन हे फळाफुलांनी बहरलेला डोंगर
तर कोणास भासे जीवन बर्फाच्छादित एव्हरेस्ट शिखर

कोणास वाटे जीवन जणू मंद प्रकाश देणारा दिवा
तर कोणास भासे जीवन उसळत्या आगीचा वणवा

कोणास वाटे जीवन जणू वाट मऊ मखमली गालीचा
तर कोणास भासे जीवन वाटेतले खळगे आणी काचा

कोणास वाटे जीवन जणू श्रावणाच्या रिमझिम सरी वर सरी
तर कोणास भासे जीवन अतिवृष्टी फाडूनी आभाळ वरी

कोणास वाटे जीवन जणू बासरीतले सूर मधुर
तर कोणास भासे जीवन ढगांचा गडगडाट भयंकर

कोणास वाटे जीवन जणू वार्याची झूळूक छान
तर कोणास भासे जीवन  वादळी वारा तो बेभान

कोणास वाटे जीवन जणू  स्वच्छंदी भिरभिरती पाखरे
तर कोणास भासे जीवन पिंजर्यातला जीव तो गुदमरे

कोणास वाटे जीवन जणु मधूरसाने तृप्त झालेली कोकीळा
तर कोणास भासे जीवन तहानेन व्याकुळ झालेला कावळा

जीवन हे सागर, सुखदुःखाच्या लाटा येतात आणि विरतात
किनारा गाठण्याच्या लाटांच्या  धडपडीला जगणं म्हणतात

कधी जीवन हा समुद्र त्यात ना सुखदुःखाच्या लाटा ना तरंग
सारं काही निःस्तब्ध अचेतन, शून्यात हरवलेलं जगणं  बेरंग

असू दे जीवन कोडं किती ही गहन आणि  कठीणं
स्विकारा आव्हान जा सामोरे तेच खर्या अर्थाने आहे जगणं

नको भरकटू नको घालू वेळ वाया सोडविण्या जीवन कोडे
सुटेल कोडे, टाक तू आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे पुढे


शुभांगी सुभाष
shubhgaik@gmail.com