तू शिल्पकार तुझ्या आयुष्याचा

Started by Shubhangi Gaikwad, May 20, 2020, 11:01:48 AM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

संस्काराची तीक्ष्ण छिन्नी अन् शिस्तीचा वजनी हातोडा
कर आत्मसात मायबापाकडून जीवनाचा पहिला धडा
घेऊनी छिन्नी अन् हातोडा हो शिल्पकार तुझ्या आयुष्याचा

जाण मोल कष्टाचे मातेच्या,देताना जन्म तुजला, तिने घेतले
मायेच्या वर्षावात न्हाऊ घालून, संस्काराचे बाळकडू पाजले
ह्रदयाशी घट्ट कवटाळूनी तुजला, शमवीला दाह वेदनांचा
घेऊनी छिन्नी अन् हातोडा हो शिल्पकार तुझ्या आयुष्याचा

ओळख मर्म त्या शिस्तिचे, जरी वाटला बाप किती कठोर
प्रत्येक पडणार्या पावलावर तुझ्या, ठेवी  घारीची नजर
ध्यानी मनी त्याच्या, सतत विचार तुझ्या भवितव्याचा
घेऊनी छिन्नी अन् हातोडा हो शिल्पकार तुझ्या आयुष्याचा

घाव घाल प्रयत्नांचे आयुष्य खडकावर, निर्मीण्या जीवनशिल्प
नको दवडू वेळ वाया, ठेव भान, तारूण्याचा काळ आहे अल्प
साकार जीवनमूर्ती अशी, अभिमान वाटू दे तुला जन्म देण्याचा
घेऊनी छिन्नी अन् हातोडा हो शिल्पकार तुझ्या आयुष्याचा

प्रयत्नाच्या प्रत्येक घावा परी, घेईल आकार तुझं जीवन
म्हणूनी घाल प्रत्येक घाव विचारपूर्वक, राहूनी सावधान
पाहूनी तेजस्वी जीवनशिल्प, श्वास घेशील आत्म समाधानाचा
घेऊनी छिन्नी अन् हातोडा हो शिल्पकार तुझ्या आयुष्याचा

शुभांगी सुभाष
shubhgaik@gmail.com