*** मनातलं वादळ ***

Started by धनराज होवाळ, May 27, 2020, 01:34:56 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


*** मनातलं वादळ ***

भर दुपारी टिव्ही पाहत बसावं अन् इतक्यात लाईट जावी..
मग घ्यावा तो मोबाईल आणि बसावं डोकावत त्यात टिवल्या बावल्या करत..
मग काही वेळानी मोबाईल ही बाजूला फेकावा..
अन् हाताची घडी घालून बसावं त्या खिडकीतल्या फुलाला बघत..
मग एकटक त्याला बघून हरवून जावं एक वेगळ्याच विश्वात..
जिथे अचानक फुटावा पाझर मनाला अन् यावा भुकंप आठवणींचा..
मग गेलेल्या त्या क्षणांची राखरांगोळी उडावी डोळ्यात.. आणि यावा तो त्सुनामी आसवांचा,
ज्याला थांबवणं ही आता शक्य नसेल..
विचारांचा कल्लोळ इतका व्हावा की हृदयाची धडधड ही ऐकू येऊ नये..
हा गोंगाट शांत करण्यासाठी डोळे घट्ट मिटावं अन् लगेच तिचा चेहरा समोर यावा..
मग छातीवर जणू ढोल वाजावा इतका इतका हृदयाचा आवाज यावा.. मग तो आवाज हळूहळू कंठापर्यंत यावा, अन् कंठ तिथेच दाटावा..
श्वास घेणे सुद्धा अवघड वाटावं जणू एखादा घास कंठात अडकलाय..
सारं शरीर मग क्रोधात पेटावं.. आणि वाटावं जोर जोरात आक्रोश करावा.. मनातली आग काढून टाकावी...
मग इतक्यात.... इतक्यात.... बायकोनी हात खांद्यावर ठेवावा अन् सारं काही तिथेच स्तब्ध....
हृदयाची धडधड अचानक काही वेळासाठी बंद पडावी...
ते वादळ, तो भुकंप, तो त्सुनामी सारं काही शांत....
मग लगेच अचानक ती मंद वाऱ्याची झुळूक यावी.. हवी हवीशी वाटणारी..
भर दुपारी तापलेल्या मातीत पावसाची रिमझिम यावी.. अन् यावा तो मातीचा सुगंध मनाला प्रसन्न करणारा..
मग डोळे उघडून बघावं तर बायकोचं प्रेमळ हास्य दिसावं..
तिने विचारावं.. "काय झालं...?" मी हसून "काही नाही.." म्हणून वर बघावं..
पंखा चालू.. लाईट आलेली...
वाऱ्याच्या त्या मंद झुळकीने मनातलं वादळ केव्हाच शांत केलं होतं..
तिला जवळ घेऊन मी माझा वर्तमान आणि भविष्यकाळ जिंकला होता..
कारण तिच्या त्या प्रेमळ हास्याने माझा भुतकाळ केव्हाच हरवला होता..
-
🤴🏻 प्रेमवेडा राजकुमार 🤴🏻
( ©धनराज होवाळ)
मो. ९९७०६७९९४९.