बालपण

Started by Ira, June 05, 2020, 08:21:10 PM

Previous topic - Next topic

Ira

बालपण
----------
मनी आज आले बालपणी रमावे,
लहान होऊनी मुक्त बागडावे,
बाहुलीशी माझ्या कडकडूनी भेटावे,
कुठे होतीस तू असे पुसावे.

मनी आज आले बालपणी रमावे,
लंगडी, साखळी अन लगोरी खेळावे,
खेळताखेळताच रुसूनी बसावे,
अन कुणीतरी मायेने गाल ओढावे.

मनी आज आले बालपणी रमावे,
पहिल्या पावसात चिंब भिजावे,
अन कागदी होड्या करुनी
जळात अलगद सोडावे.

मनी आज आले बालपणी रमावे,
गुरफटून आईच्या पदरात शिरावे
गाढ झोप लागता कुणी न उठवावे,
स्वप्नचित्र रंजक मन:पटलावर दिसावे.

मनी आज आले बालपणी रमावे,
भातुकलीच्या खेळातील सवंगडी जमवावे,
खोटाच भात अन खोटीच आमटी वाढून,
जेवण सुरेख झाले असे वदावे.

सरले दिवस अन सरल्या रात्री,
आठवणीत अशा रमु किती,
शाळा, दप्तर, पुस्तक, पाटी,
सुंदर होती बालभारती.

देऊन वळणे अक्षरांना ,
        शब्दांच्या कविता जाहल्या,
हृदयातील कप्पा आता,
         बालस्मृतींचा स्रोत झाला.

ऋतुमागून ऋतू गेले,
काळ बदलला, बालपण बदलले,
पत्रही गेले, ई-मेल आले,
भावनांचे तर इमोजी झाले,
पण चिरंतन आहे आईची ममता,
बाल्यांचे हास्य अन निरागसता,
उजळत राहो निरंतर मनी,
बालपणाचा सुदृढ वारसा।।

--अमिता--