सांगे भाग्यशाली तुझी गौरवगाथा

Started by Shubhangi Gaikwad, June 06, 2020, 12:18:09 PM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

रक्ताने भिजली स्वप्ने, रक्ताने लिहीली गाथा
सांगे मज मी भाग्यशाली, तुझी ही गौरवगाथा

भय शब्द न ज्याला ठावे,शूरवीर तू निधड्या छातीचा
ठेवूनी तळहातावरी प्राण ह्रदयात देशभक्तीची प्रार्थना
भारावूनी गेले पाहूनी अद्वितीय सैनिकी रूपाला तुझ्या
जीवन अर्पूनी तुजला ठेविला निशंकपणे खांद्यावर माथा
सांगे मज मी भाग्यशाली, तुझी ही गौरवगाथा

जाणले सूपूत्र तू मातृभूचा आधी, नंतर तू माझा
तव सहवासाच्या सुखद क्षणांनी अर्थ मज लाभला
युद्धात तू सीमेवरी,ऊन पाऊल थंडी,नसे पर्वा तुला
निजविते आपुल्या फुलाला सांगुनी तव शौर्यकथा
सांगे मज मी भाग्यशाली, तुझी ही गौरवगाथा

प्राणपणाने लढला घायाळ होऊनी केला त्याग देहाचा
तुझी मालवती प्राणज्योत ठेवली तेवत मी ह्रदयात माझ्या
श्वास घेते समाधानाचा पाहूनी बाळाच्या रूपात तुजला
तू आहेस माझ्याच सोबत, आता कसली न उरे व्यथा
सांगे मज मी भाग्यशाली, तुझी ही गौरवगाथा

माझ्या मायेची घातली सांगड पितृकर्तव्याशी तुझ्या
वाढविण बाळ आपुले, ते करील तव स्वप्नाची पूर्तता
तव धैर्य सामावले मम अंतरी मीच माझी भाग्यविधाता
हरणार नाही राहूनी खंबीर,देते वचन तुजला मी नाथा
रक्ताने भिजली तव स्वप्ने, रक्ताने लिहीली गाथा
सांगे मज मी भाग्यशाली, तुझी ही गौरवगाथा


शुभांगी सुभाष गायकवाड
shubhgaik@gmail.com





Shubhangi Gaikwad

तुम्हाला कविता आवडली त्याबद्दल
  तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.