गेली वसुंधरा मोहरूनी

Started by Shubhangi Gaikwad, June 10, 2020, 07:30:58 AM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

असह्य केलं जगणं ग्रीष्मान, गेली धरा पार कोमेजुनी
सख्या वरूणाच्या भेटीसाठी, गेली कासावीस होऊनी

ग्रीष्माच्या जुलूमाने वसुंधरा झाली केविलवाणी
शुष्क झाले पाणीदार डोळे आटून गेले पाणी
भेगाळले अंग अंग तिचे तप्त आसूडी फटक्यांनी
शालू तिचा हिरवा बेरंग होऊनी गेला पार विरूनी

सोसवेना विरह वसुंधरेला,वरूणाला घातली साद
सोडविण्या प्रियेला, वरुणराजाने धाव घेतली नभात
काळ्या मेघांनी गडगडाट केला,ग्रीष्माला ललकारत
समशेर वीजेची तळपली झाला चौफेर लखलखाट

आसमंताच्या सीमेवरी पाहाताच वरुणराजाची स्वारी
भयभीत झाला ग्रीष्म मनी, केले पलायन हार मानुनी
वरुणाचे झाले आगमन भूवरी वार्यावर स्वार होऊनी
स्पर्श होताच प्रियाचा, गेली धरा चींब चींब भिजूनी

प्रीतीचे फूल उमलले दरवळला सुगंध ओल्या मातीचा
तनमन धरेचे गेले बहरून प्राशन करूनी अमृतधारा
पानाफूलांचा शृंगार केला,ल्याली शालू पाचूचा हिरवा
साजरी गोजिरी नववधू लाजरी प्रियाची झाली वसुंधरा

लावण्यवती झाली धरा, गेली तिची कळी खुलूनी
सख्या वरुणाच्या सहवासात आता गेली मोहरूनी


शुभांगी सुभाष गायकवाड
shubhgaik@gmail.com