पुन्हा फुलवू शाळेचे नंदनवन

Started by Shilpa Mohite, July 05, 2020, 11:24:46 AM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

पुष्प १५ वे
           पुन्हा फुलवू शाळेचे नंदनवन

वेशीवरचा कोरोना हळूच देशात शिरला
शहराबरोबरच तो गावागावात फिरला

बघता बघता त्याने देशभर विणले जाळे
साऱ्या आस्थापनांना लावावे लागले टाळे

शारदेचे मंदिरही करावे लागले बंद
हरपला सारा विद्येच्या मंदीरातील आनंद

हरवले प्रार्थनेचे सूर आणि पाढ्यांची आवर्तने
विद्यार्थ्यांविना सारे वर्ग झाले सुने-सुने

बोलक्या भिंती रुसल्या, मुका झाला फळा
हसत्या खेळत्या शाळेला आली अवकळा

सर्वत्र निरव शांतता,मैदाने पडली ओस
दंगा मस्ती संपली,संपला सारा जोश

विद्यार्थ्यांविना शाळा जणू आत्म्याविना शरीर
कधी जागृत होईल हे शारदेचे मंदिर

गुरू -शिष्यांचे नाते जणू आई आणि मुले
गुरुविना विद्यार्थी जणू कोमेजलेली फुले

हे शारदे माते! दूर कर हे संकट,करतो तुला वंदन
गुरू-शिष्य मिळून पुन्हा फुलवू शाळेचे नंदनवन
       
                       - शिल्पा मोहिते