माझं माहेर माहेर

Started by Shilpa Mohite, October 06, 2020, 12:40:43 PM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

पुष्प २० वे

        माझं माहेर माहेर

माझं माहेर माहेर
जणू आनंदसागर
ओसंडून गं वाहे
जणू सुखाची घागर

माझी माय गं प्रेमळ
जणू मायेची पाखर
वावरते घरामध्ये
जणू दुधात साखर

माझा बाप कनवाळू
परि पहाड खंबीर
संकटाचा पहिला घाव
स्वतः झेली अंगावर

माझा भाऊ पाठीराखा
मनाने गं दिलदार
देई प्रत्येकाला साथ
जणू घराचा आधार

माझी वहिनी साजिरी
राखी सर्वांचा आदर
पै-पाहुण्यांचा करी
अदबीने पाहुणचार

माझी बहिण लाडकी
आहे फार ख़ोडकर
जणू चैतन्याचा झरा
वाहे साऱ्या घरभर

माझी भाचवंडे गोजिरी
जणू साय दुधावर
त्यांच्या बोबड्या बोलांनी
येई आनंदाला पूर

माझं माहेर माहेर
जणू भरलेलं गोकुळ
माहेराला जाण्यासाठी
जीव झाला गं व्याकुळ

      -शिल्पा मोहिते

Atul Kaviraje

     शिल्पा मॅडम, एकदा का मुलगी सासरी गेली, आणि तिथे ती तिच्या संसारात रमली, कि तिला माहेरची कधी कधी आठवण येते, असं क्वचितच घडत. पण,नाही. तिचे शरीर जरी  सासरी असलं , पण मन मात्र माहेरच्या घरी, अंगणी पिंगा घालीत असते, तिची माहेरची जोडलेली नाळ, तुटता तुटत नाही, इतकी ती त्यात जास्तीत जास्त गुंतून जाते, सतत तिला माहेरची याद येत असते.

     घर हे फक्त चार भिंतींचे छप्पर नसते, तर ते स्वतःच्या नातलगांनी भरलेले सुंदर मंदिर असते. आई, वडील, भाऊ, वाहिनी, बहीण, भाऊ व इतर भावंडे, यांच्या बरोबर इतकी वर्षे  राहिलेल्या या सासुर वाशिणीला त्यांची आठवण नाही आली तर नवलच.

     या सर्व नात्यांचा नाते-संबंध, आपल्याशी कसा आहे, हे ही सासुर-वाशीण सोदाहरण देत आहे. माहेर  हे  आनंद-सागर, सुख-घागर, आई ही माय-पाखर, दूध-साखर, वडील हे कनवाळू  ,दयाळू, खंबीर   पहाड, भाऊ हा दिलदार, घराचा आधार, बहीण हि खोडकर, घरभर वावरणारा चैतन्याचा झरा, वाहिनी ही सर्वांचा आदर ठेवून मनापासून पाहुणचार करणारी, इतर लहान भावंडे हि दुधाची साय, आणि खूप काही.

     " माझं माहेर माहेर " , या कवितेतून आपण माहेर अक्षरशः जिवंत केले आहे. इतकं कि, माहेरचं सुंदर चित्रण करून, ते डोळ्यांसमोर उभे केले आहे. आपल्या या कवितेतून मला आपल्या दयाळू, सहृदय, नात्याप्रती आपलेपणा इत्यादी अनेक भावना समजून आल्या आहेत. सरळ , सोप्या भाषेत आपल्या या कवितेने मन जिंकले आहे.

 
      घर होते केव्हातरी घरासारखे
      कुठे राहिलीत ती नाती
      अलिप्त झालीत सर्व माणसे
      लुप्त होत चाललीय संस्कृती

      एकत्र कुटुंब चित्रातूनच पाहायचे
      अन  त्या आपलेपणाच्या स्नेह-भिंती
      येतील का ते दिवस परत ?
      दिसेल हृदयातील स्नेह अन प्रीती.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-०८.०६.२०२१-मंगळवार.