आस !!!

Started by Ashok_rokade24, October 26, 2020, 06:02:30 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

जरी वाट पहातो सुर्यास्ताची ,
भिती दाटते मनी अंधाराची,
हुरहुर अंतरी नीत वाटे ,
साथ ही सदैव का वादळाची ॥

वनवा चहू दिशांनी पेटला ,
ज्वालांच्या लवलवती जिव्हा ,
डाव असा श्वापदांनी साधला ,
श्रृंखला अडखळली श्वासाची ॥ 

धूम्र वलय हे सभोवताली ,
सावलीनेही साथ सोडली ,
एकांतीअसे ग्रासले भयाने ,
वाटही वेगळी जिवलगांची ॥ 

आपुले म्हणून कैक भेटले ,
परि कधी न ते आपुले झाले ,
घाव किती अंतरी बरसले,
साथ न लाभली आपुलकीची ॥

जरी झाली वर्षा जखमांची ,
जरी न लाभो साथ कुणाची ,
धडपड ही असे जगण्याची ,
मनी आस नित सुर्योदयाची ॥

जरी वाट पहातो सुर्यास्ताची ,
मनी आस नित सुर्योदयाची ॥
 
अशोक मु.रोकडे.
मुंबई.