" खरोखरच युद्ध - विराम झालाय का ? "

Started by Atul Kaviraje, May 22, 2021, 07:44:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     मागील पंधरवड्यात परराष्ट्री पॅलेस्टाईन व इस्त्राईल, यामध्ये जे वाद सुरु होते, त्याने युद्धाचे स्वरूप धारण केले होते. बरीचशी राष्ट्रे , महासत्ता यात कळत-नकळत ओढली गेली होती. जमिनीच्या, धार्मिक तेच्या आणि बऱ्याचश्या कारणांवरून या युद्धाची नांदी झाली होती.

     पण अंती, हे लहानसे युद्ध दोन्हीकडील बाजूनी तह होऊन थांबविण्यात आले. शांती करारावर दोन्हींकडून सह्या झाल्या. व थोड्या काळापुरताच का होईना, सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. मी थोड्या वेळापुरताच अश्यासाठी म्हणतोय, की हे युद्ध जरी तात्पुरते थांबले असले, तरी हा वाद पुन्हा उफाळून येणार नाही कश्यावरुन ? इतिहास साक्षी आहे, की अशी युद्धे , तह झाल्यावरही पुन्हा पुन्हा होतच राहातात. त्यांना अंत नसतो.

      तात्पुरता झालेला हा युद्ध - विराम, हा तह मला वाटत क्षणिकच असावा. कारण कुठेही, कशीही अकारण ठिणगीही युद्ध पेटविण्यास कारणीभूत ठरते. कळत - नकळत जगातील इतर राष्ट्रेही यात ओढली गेल्यामुळे, तिसऱ्या महायुद्धाचीही भीती नकळत मनाला स्पर्श करून जातेय, यात नवल नाही.

     हे असेच सुरु राहिले, तर मानव - जातीचे काय भविष्य आहे, हे सुज्ञास सांगणे नलगे.

     ऐकुया तर, या युद्ध-विरामावर, युद्ध- तहावर एक वास्तव - वादी कविता.
     कवितेचे शीर्षक आहे - " खरोखरच युद्ध - विराम झालाय का ? "

                        " खरोखरच युद्ध - विराम झालाय का ? "
                        -----------------------------------



     खरोखरच युद्ध - विराम झालाय का ?
     शांततेचा वारा वाहातोय  का ?
     भयभीत मानव, मोकळा श्वास
     छातीत भरभरून घेईल का ?

     हा तह तह-हयात टिकेल का ?
     हा वाद  पूर्ण मिटलाय का ?
     युद्ध नको, बुद्ध हवा
     युक्तिवाद कायम राहील का ?

     मानवाचा लालची, लंपट स्वभाव
     गप्प राहू देईल का ?
     आणिक मिळवण्या, हव्यासा पोटी
     पुढचे पाऊल उचलेल का ?

     संयम, विवेक तिथेच  संपतो
     सारासार विचार  मात खातो
     ठिणगी पडताच आंधळा होऊन
     मागचे पुढचे विसरून जातो.

     काय तुझे व काय माझे
     नाही आहे काही कायमचे
     तरी मदांध, मत्तान्ध मानव
     घोट घेतात एकमेकांच्या नरडीचे.

     
     हा वाद पुन्हा पेटेल ?
     इतिहास साक्षी आहे याला
     पानांपुरताच मर्यादित न राहाता
     पुन्हा डोके वर काढेल.

     नांदी नाही महायुद्धाची तिसऱ्या ?
     या लहानग्या युद्धाने रुजवलेली
     अंती  याचा विचारच नको
     डोळ्यांपुढे ते चित्रही नको.

     आता तरी शहाणा हो
     सोड ही हाव सत्तेची
     युद्धाने निष्पन्न काही नाही
     मातीत मिसळेल अनमोल जीवही.


-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-शनिवार-22.05.2021.