पहिल्या पावसाची कविता - " पहाता-पहाता घन भरले, गेले ओथंबून"

Started by Atul Kaviraje, June 04, 2021, 11:59:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     मित्रानो, आज नेहमीप्रमाणेच ऑफिस मधून घरी येण्यास निघालो. ट्रेन मधून येता येता पावसाची लक्षणे दिसून येत होती. घरी येऊन अंघोळ, नाश्ता वगैरे करून बाल्कनीत रोजच्या प्रमाणे चहाचा वाफाळलेला कंप हाती घेऊन सायंकाळच्या निसर्गाची दृश्ये मनात साठवीत होता. साधारण आठ चा सुमार असेल. पहाता पहाता क्षितिजावर पश्चिम दिशेला एक अद्भुत दृश्य मला दिसून आले. हळू हळू ढगांची दाटी जमल्याचे, व ती अधिक गडद होत असल्याचे चित्र माझ्या डोळांनी टिपले. एकाएकी गार वारा सुटून, त्यास अचानक जोरही चढल्याचे जाणवले. अचानक आकाशातून त्या ढगांतून विजेचा लोळ  धर्तीस स्पर्शून गेल्याचे दिसून आले.

     हे इतक्या जलद घडले, कि माझा चहाही   पिऊन संपला नव्हता. आणि मग ज्या अमृत थेंबाची मला अपेक्षा होती, तो पर्जन्य टप - टप   थेंबाच्या रूपात धरित्रीवर येऊन दाखल झाला.  त्या थेंबांनी हळू हळू शिवरत ,धारारूपी बरसू लागले . गारवा माझ्या अंगो-पांगी खेळवून मला तकवा देत होता.एक अनोखी अननुभूती मला हा पाऊस त्याच्या प्रथम-दर्शनी, त्याच्या नांदीने देऊन गेला. हे अविस्मरणीय दृश्य मी माझ्या डोळ्यांनी मनांत साठवीत होतो. त्या पर्जन्य रुपी  ईशाचे आज मला दर्शन होत होते.

     आणि पावसाला आजपासून खरी सुरुवात झाली होती. मित्रानो, तुम्हीही सारे कधी ना कधी या दिव्य अनुभवातून गेला असालच. असो, मला कविता न सुचेल तरच नवल.  ऐकुया तर पहिल्या पावसाची, मला अनुभव आलेली, प्रत्यक्ष पाहिलेली, नजरेसमोर घडलेली कहाणी, कवितेच्या रूपात- माझ्या कवितेचे शीर्षक आहे - " पहाता-पहाता घन भरले, ओथंबून गेले"

                  " पहाता-पहाता घन भरले, गेले ओथंबून"
                  ----------------------------------

काळा कभिन्न घन, घेऊन आला चंदेरी कोंदण
वर वीज करुनी तांडव, देत प्रकाशाचे आंदण
वातावरणी गारवा आला, सायंकाळच्या प्रहरी,
पहाता-पहाता घन भरले, गेले ओथंबून.

     गार वारा पश्चिमेस सुटलासे अचानक
     पाचोळा उडवीत साऱ्या आसमंती ,गरगरा फिरवून
     प्रतीक्षेत होते प्राणी-मात्र, मानव, शेत आनंदून,
     पाहता-पहाता घन भरले, गेले ओथंबून.

नांदी होती ती एका नवीन वृष्टीची
चाहूल होती लागत सर्वां पर्जन्य-राजाची
सरसर रान सारे, डोलू लागले आनंदून,
पहाता-पहाता घन भरले, गेले ओथंबून.

     सहस्त्र-धारांनी गर्जत पाऊस तो प्रकटला
     धरित्रीसी घेत कवेत उल्हासित झाला
     रिती अपुली घागर करीत होते आनंद-घन,
     आणि, पहाता-पहाता घन सारे, गेले बरसून.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.06.2021-शुक्रवार.