इंद्र-धनु कविता - " ऊन पावसाचा विलक्षण खेळ "

Started by Atul Kaviraje, June 06, 2021, 12:53:04 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     पावसास न्याहाळताना सहज सुचलेली एक कविता. मनात विचार आला, कि श्रावण मासांत, ऊन पावसाचा जो खेळ, लपंडाव आपणास पाहावयास मिळतो, आणि त्यांच्या त्या अमूर्त मिलनातून मन विभोर करणारे, सुंदर, नयन-रम्य सप्तरंगी इंद्रधनुष्य आकाशात या क्षितिजापासून ते त्या क्षितिजापर्यंत गवसणी घालते. हे पाहून मर्त्य मानवाचे डोळे दिपून गेल्याशिवाय राहात नाहीत. या निसर्ग - रम्य दृश्याची एक कहाणी-रुपी कविता करावी, असे मनात आले.

     पावसाळा सुरु झाला की, उन्हास वाटतं कि माझे अस्तीत्व नुरले, माझी किरणे निष्प्रभ झाली, या पावसाने मला आपल्या अतिक्रमणाने मला भूवरी उतरू दिले नाही, आणि बरंच काही. असो, या खेळामध्ये, उन्हाची कैफियत ऐकता ऐकता पाऊसही आपले मनोगत कथित करीत असतो. त्यांच्या या वाद-विवादी स्पर्धेकडे, खेळाकडे पाहून या विषयावर काहीतरी लिहावे, असे प्रकर्षाने जाणवले व एक दीर्घ कविता मनात स्फुरली. असो, कविता ऐकुया, माझ्या कवितेचे शीर्षक आहे - " ऊन पावसाचा विलक्षण खेळ "

                     " ऊन पावसाचा विलक्षण खेळ "
                     ---------------------------

दाटीवाटी ढगांची, गगन झाकोळले
धीम्या-पाउली तिमिराने, धरणीस आक्रमिले
शीत वाऱ्यासवे, गारा बरसल्या,
पहाता-पहाता पावसाचे अस्तीत्व जाणवले.

     ऊन असहाय्य, फसले या आक्रमणात
     अंधुक झाली किरणे, विरली आसमंतात
     मोकळी सापडेना वाट क्रमणाची,
     निष्प्रभ झाले, जाणवेना झळ उन्हाची.

कृष्ण-घन, पटला-आडून पाही बिचारे
पावसास अनाहूतपणे राहून-राहून विचारे
का रे मला असे अडवलेस तू ?
का केलीस किरणे माझी निष्प्रभ तू ?

     जाऊ दे मला, पडू दे भूवरी
     करावयाचे मला चैतन्याचे दान
     माझ्या येण्याने मानव प्राणी आनंदतो,
     करू दे मला त्यांचे क्षेम अन कल्याण.

उत्तरला पाऊस, हे उन्हा
थोडी थांबव तुझी मक्तेदारी
पडू दे मलाही, करू दे त्यांचे हित
माझीही आहे काही जबाबदारी.

     कोंडलेले ऊन गेले काळवंडून
     किरणे हळू-हळू जात होती विरून
     करुणा भाकीत होते ते पावसाची,
     ताकद कळली होती त्यास मेघ-एकतेची.

अंती उन्हाचे आले आर्जव कामी
पावसासही सुचली युक्ती नामी
म्हणाले जाऊ एकमेकांत मिसळून,
दाखवू मानवास, एक अद्भुत दृश्य साकारून.

     धरतीवरी माणसाचे सहज लक्ष्य गेले वर
     खिळली, नयनरम्य क्षितिज दृश्यावर नजर
     इंद्रधनूची सप्तरंगी कमान घालीत होती,
     आकाशास गवसणी फार दूर- दूर वर.

ऊन हासले, म्हणाले पावसास
तुझ्यात मिसळून झाले मी कृतार्थ
आजवर माझीच होती सत्ता जगतावर,
तुझ्या येण्याने, माझ्या असण्यास आला खरा अर्थ.

     ऊन पाऊस खेळतात खेळ, दरवर्षी न चुकता
     अवतरते सप्तरंगी इंद्रधनुष्य, पहाता-पहाता
     पाहाण्यास, मानवाची तयारी आहे थांबण्याची,
     उत्सुकता आहे, श्रावण मासासही याची.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-०६.०६.२०२१-रविवार.