वास्तव-वादी कविता - " आणि किती इमारती कोसळणार ?"

Started by Atul Kaviraje, June 10, 2021, 08:05:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


मित्र/मैत्रिणींनो,

     आताच, एक बातमी ऐकण्यात आली कि, मुंबईतील एका ठिकाणची जुनी इमारत पावसाने कोसळली.
आज एक इमारत कोसळेल, उद्या दुसरी, तर परवा तिसरी. हे कधीपर्यंत चालणार ? पाऊस तर दरवर्षी नित्य-नेमे येतो, आणि दर वर्षी तो मुसळधारही कोसळतो, म्हणून का दर वर्षी या जुन्या इमारतींनी पावसाचा जोर सहन न होऊन कोसळावे ? त्याचे काहीही नियोजन का नसावे ? हे दर वर्षी घडतंय, घडत आलंय ,आणि पुढच्याही वर्षी असंच घडणार !

     या जवळ-जवळ पाऊणशे, शंभर वर्षे वयोमान असलेल्या इमारतींच्या, चाळीच्या  पुनर्वसनाची दखल कुणीच कसं घेत नाहीय ? आपलं सरकार काय करतंय या बाबतीत ? यात फक्त आमच्या तुमच्या सारख्या सामान्य माणसांचाच जीव जातो. जीव का इतका स्वस्त झालाय कि तो असा अपघाताने जावा !
यापुढे हे घडू  नये म्हणून सरकार काय उपाय-योजना करतेय ? काय हालचाल करतेय ? कि अपघात घडल्यावरच एखाद्या नेत्याने तोंड दाखवावे, आणि दुर्घटना-ग्रस्त परिवारास आर्थिक मदत करावी आणि नंतर गप्प राहावे. असंच दर-वर्षी घडत आलंय.

     एकंदरीत इमारतींना, किंवा चाळींना ५० वर्षे पूर्ण झाली कि, त्यांचे आयुष्य संपत येते, त्या ठिसूळ होऊ लागतात, तकलादू , कमजोर होऊ लागतात. असे यापुढे न होण्यास, असे पावसाळी अपघात टाळण्यास आणि नाहक जीव न जाण्यास, सरकारने काही नियोजन करावयास हवे, लोकांचे पुनर्वसन व्हावयास हवे, त्यांना नवी घरे राहण्यास मिळावीत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी सरकारने अश्या जुन्या, जीर्ण, पडक्या इमारतींचा सर्वे करून, त्या आधीच जमीन-दोस्त करून, नाहक जाणारे जीव वाचवावेत, असे मला प्रकर्षाने वाटते.

     असो, उपरोक्त विषयाचे कवितेत रूपांतर करावे, व समाजासमोर, सरकारसमोर ही अत्यन्त जरुरीची बाब आणावी, असं मनापासून वाटल. माझा कवितेचे शीर्षक आहे - " आणि किती इमारती कोसळणार ? "

                                             वास्तव-वादी कविता
                                   " आणि किती इमारती कोसळणार ?"
                                   --------------------------------

नेमेचि येतो मग पावसाळा
कुणा कवीच्या या काव्य-पंक्ती
श्रुष्टीस हिरवाईचे देत आंदण,
सुख येते, दुःखास मिळते मुक्ती.

     चातकासम मानवासही प्रतीक्षा पावसाची
     नयन-रम्य अन मना-तनाच्या तृष्णेसाठी
     मरगळ झटकून, उल्हास अंगो-पांगी,
     चैतन्याचा झरा वाही भरून काठो-काठी. 
 
कधी तो हवा-हवासा वाटतो
तर कधी रुद्र होऊन बरसतो
ढग-फुटी होऊन कधी, मुसळधार,
महा-पुराच्या रूपात प्रकट होतो.

     पाहात नाही तो रस्ते, ठिकाणे
     पाहात नाही तो वस्त्या, मकाने
     अक्राळ-विक्राळ होऊन बरसतो,
     गर्जत-वाजत येऊन कोसळतो.

अवशेष झालेल्या जीर्ण इमारती
त्यापुढे अक्षरशः हतबल होतात
त्याच्या या महा-प्रलयी रूपास,
बळेच,नत-मस्तक,गुडघे टेकतात.

     नाही थांबवू शकत कुणीच उत्पात
     जे घडायचं तेच घडते
     मानवाचे येथेच अंदाज फसतात,
     असहाय्य इमारती कोसळत असतात.

निरपराध्यांचा जात असतो जीव
नाहक, दोष कुणाचा यात ?
जीव नाही परतुनी येतं,
पैसे मिळतात, भरपाईचे मोबदल्यात.

     सु-नियोजित व्यवस्था राबविण्यात यावी
     टाळण्या असे पावसाळी अपघात
     पुनर-वसनाचेही हवे धोरण सरकारचे,
     कुटुंबांवर होण्या-आधी हा आघात.

मग पाऊस कसा सुसह्य होईल
मग पाऊस आपलासा होईल
उपाय-योजना झाली वेळेवरही,
दुःख मग उरणार नाही नावालाही.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१०.०६.२०२१-गुरुवार.