ऊन-पाऊस कविता - " आज चक्क ऊन पडलंय "

Started by Atul Kaviraje, June 18, 2021, 11:19:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     काल याच वेळी पाऊस नुसता पडत होता, थांबायचे नाव घेत नव्हता. मनमानी करीत होता. सतत, मुसळधार, संततधार कोसळत होता. सर्व मनुष्य-प्राण्यांची मजा पाहात होता. सर्वाना  भिजवून  टाकत  होता. सारीकडे, कसं  पाणीच पाणी झाले होते. इतका तो बेगुमान झाला होता.

     पण, आज म्हणजे शुक्रवारी काय घडलं ते कळलंच नाही. कालचा पाऊस आज गायब झाला होता. सकाळीच मी नोकरीस जाण्यास निघालो, ते चक्क उन्हातच, होय मित्रानो, आज तेच तेच हवं-हवंस वाटणार  ऊन धरतीला न्हाऊ घालीत होते. धरतीस प्रकाशित करीत होते. आपली अनोखी  ऊब देत होते. पावसाच्या पाण्यात न्हालेल्या सर्व प्राणी-मात्रांस आपल्या कोवळ्या उबदार हस्ताने कवेत घेत होते. त्यांना ऊष्मां देत होते.

      निसर्गाने चक्क कूस बदलली होती . कालचा पाऊस आज नावालाही दिसत नव्हता. त्याची जागा आज उन्हाने घेतली होती. आणि हे फक्त निसर्गालाच जमतंय. त्याच्याकडेच  ती अपिरिमित शक्ती आहे. ऊन-पावसाचा हा खेळ, पाठ-शिवणीचा खेळ, लपंडाव मनुष्यास अचंबित करून टाकतो. चला तर ऐकुया, या बदलत्या निसर्गावर एक प्रस्तुत कविता. कवितेचे शीर्षक आहे- " आज चक्क ऊन पडलंय "

                            ऊन-पाऊस कविता
                        " आज चक्क ऊन पडलंय "
                        ------------------------

कालच ते रौद्र रूप
पावसाचे ते अरुप स्वरूप
आज नावालाही दिसत नव्हते,
आज पावसाचे नावही नव्हते.

उन्हाने आज जागा घेतलीय
त्याच्या किरणांना जाग आलीय
मृदुल,उबदार हस्ते धरित्रीची,
त्यांनी हलकेच मृदा कुरवाळलीय. 

उबदार ऊन हवंहवंसं आहे
गात्रांच्या शीर-शिरीवर औषधच आहे
तनुचा गारवा कुठेच पळवणार,
ऊन हा उपाय आहे.

पाठ-शिवणीचा हा खेळ
ऊन-पावसाचा हा एकत्री मेळ
मनुष्यास आहे ज्ञात कधीचा
काळ संपलाय त्याच्या प्रतिक्षेचा.

कधी पाऊस करतोय राज्य
कधी उन्हाचे आहे साम्राज्य
लपंडाव दोघांचा, ऊन पावसाचा,
चमत्कारच नाही का निसर्गाचा ?

उद्या पुन्हा रिपरिप येईल
परवा पुन्हा उघडीप होईल
उन्हास आपले रूप दाखविण्यास,
एक पर्वणी प्राप्त होईल.

जल भरलेल्या जलदांमधून ते
हळूच डोकावून, वाकून पाहिलं
पुन्हा गगन झाकोळून जाता,
पुढल्या आगमनाच्या प्रतीक्षेत राहील.

निसर्गाचा  हा  बदलता चमत्कार
दरसाली, दरवर्षी येतो प्रत्ययास
ऊन पावसाचा पाठ-शिवणीचा खेळ,
उत्सव उत्साहाचा मिळतो पहाण्यास.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.06.2021-शुक्रवार.