जीवन जगण्याची जिवंत कविता-"ओंडक्यासही या फुटलाय धुमारा"

Started by Atul Kaviraje, June 19, 2021, 11:17:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
     
      जीवनाशी निगडित , संलग्न  ही पुढील , प्रस्तुत कविता आहे. संकल्पना अशी की, गेल्या वेळी आलेल्या चक्री वादळात जी भयानक पडझड झाली होती, सगळीकडे वाताहात लागली होती, पावसाने पाणीच पाणी केले होते, समुद्रात तुफान उठले होते, शहरांप्रमाणेच गावाकडील भागांचेही अपरिमित नुकसान झाले होते. घरांचे छत कोसळले होते, घरे पाण्याखाली गेली होती. चक्री वादळाच्या आणि भयंकर वाऱ्याच्या जोरामुळे, झाडेच्या झाडे उन्मळून पडली होती.

     कहाणी, आहे अश्याच एका उन्मळून पडलेल्या वृक्ष-फांदीची , एका ओंडक्याची. चक्री वादळ शमून बराच काळ झाला होता. त्या पडलेल्या झाडांची तोड करून मानव त्याचा वापर सरपणासाठी करीत होता. एक ओंडका बराच काळ दुर्लक्षित पलीकडे पडून होता. कधी काळी कुणाचे तरी लक्ष्य त्या तुटक्या ओंडक्याकडे गेले होते, आणि त्यास आश्चर्याचा एक धक्काच बसला होता. त्या ओंडक्यातून, पावसाच्या ओलीमुळे बऱ्याच काळानंतर चक्क धुमारा फुटला होता, एक लहानसा कोंब त्यातून डोकावत होता. पुन्हा हिरवाई, एक जीवन त्यातून डोकावत होते.

     सलाम त्या ओंडक्यास, कि ज्याने मृत होऊनही, म्हणजे त्या सुक्या निष्पर्ण ओंडक्याने पुनर्जीवन, जगण्याची जी जिद्द दाखविली होती. ती तारीफे - काबील होती. त्या इवलुश्या कोंबाच्या, रोपाच्या रूपात  पुन्हा उद्याचा एक वृक्ष घडविण्याची जिद्द तो ओंडका दाखवीत होता. निसर्गाचा हा आणि एक चमत्कार, दिसून येत होता. माणसास हा एक धडाच होता, कि त्या निर्जीव ओंडक्याने मरणातूनही जीवन फुलवले होते. ऐकुया तर मरणानंतरही  जीवन पुन्हा एकदा फुलण्याची कविता सोप्या शब्दांत . कवितेचे शीर्षक आहे- "  ओंडक्यासही या फुटलाय धुमारा"

                      "ओंडक्यासही या फुटलाय धुमारा"
                      -----------------------------

माजवला चक्री-वादळाने पुरता हाहाकार
भुईसपाट झाली होती झाडे समूळ
उखडून मातीतून आली वर कलेवरे,
वृक्ष आजानूबाहू पडलेत उन्मळून.

दणका देत पुनरपि चक्राकार
वावटळी फिरत्या गिरक्यांनी गोलाकार
पडझड होत होत आयुष्याची,
चिंता होती मानवास उद्याची.

शमली, मालवली वादळ-ज्योत केव्हातरी
नुकसान भरपाई ही कोण करी ?
अशी कितीतरी संकटे येति सामोरी,
हतबुद्ध मानव करी मनाची तयारी.

ओंडक्या-ओंडक्यांनी कोसळती वृक्ष
भयाण रान जणू वाळवंट रुक्ष
कित्येक पिढ्यानी होती पाहिली,
माणसाच्या ती होती सेवेस वाहिली.

जिवंतपणी फुलवीत होते ते मळा
मरणा-नंतरही सहत  होते कळा
उद्ध्वस्त होऊनही करीत जीवन अर्पण,
देत होते मानवास जळणास सरपण.

तो ओंडका पडून होता एकला
नजरेस कुणाच्या नाही तो पडला
दुर्लक्षित असा भिजत पावसात,
होता राहिला तसाच कित्येक दिवसांत.

कुणा एकाचे त्याजकडे लक्ष्य गेले
काहीतरी त्यास नवल आढळले
खितपत पडलेल्या त्या सुक्या ओंडक्यास,
फुटला होता इवलुसा धुमारा.

त्या ओंडक्याने जीव धरला होता
पुन्हा तो उभारू पाहात होता
फिनिक्स पक्ष्यासम राखेतून उठून,
पुन्हा जीवन जगू पहात होता.

चमत्कार निसर्गाचा, याची देही याची डोळा
आम्हा समोर दिसत होता
ओंडक्यास त्या कोंब फुटून,
लहानगा जीव फुलत होता.

पुनर्जीवनाचे ते लक्षण होते
मरणावरती मात करीत होते
उन्मळून पडताही वृक्ष फांदीने,
पुन्हा एका वृक्षास घडविले होते.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.06.2021-शनिवार.