पाऊस कविता - "आज मळभ आलीय दाटून "

Started by Atul Kaviraje, June 26, 2021, 12:30:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     त्या दिवशी म्हणजे दिनांक-०९.०६.२०२१, रोजी पावसाने जे थैमान, जो धुमाकूळ सारीकडे घातला होता, सर्वांचीच तारांबळ  त्याने उडवली होती. सर्व कारभार त्याने आपल्या पडण्याने ठप्प केले होते. तेव्हापासून तो जो उघडलाय तो आजवरही पडलेला नाही. पावसाचे दिवस आहेत, त्याचा ऋतू आहे त्याने यावयास हवे, पडावयास हवे. अगदी कसाही, म्हणजे, रिपरिप, मुसळधार, संततधार, शिवरा-शिवरी , हलका-फुलका, पण पडावयास हवाच.

     पाऊस आम्हाला हवा आहे, पाऊस आमचे जीवन आहे, पाऊस म्हणजे पाणी आहे, पाऊस आमचा देव आहे, पाऊस आमचे देऊळ आहे, अश्या त्यानेच पाठ फिरवली तर, आमचे जगणे हे जगणे नाहीच, त्याने यावयास हवे. मनापासून पडावयास हवे.

    आज सकाळीच मी जेव्हा नोकरीस जाण्यास निघालो, तेव्हा आकाशी मळभ दाटून आली होती. आणि मी जेव्हा संध्याकाळ घरी परतून आलो, तेव्हाही ती मळभ कायम होती. पाऊस काही दिवसभर पडलाच नव्हता. त्याने धारित्रीस काही भिजवलेच नव्हते .त्याच्या न येण्याने माझ्या सर्व आशांवर निराशेचे मळभ मात्र नक्कीच दाटून आले होते. असो, पावसाचे दिवस आहेत, आज नाहीतर उद्या तो नक्कीच पडेल, हेही खरं. उपरोक्त संकल्पनेवर एक कविता ऐकवितो. कवितेचे शीर्षक आहे - " आज मळभ आलीय दाटून "
                           पाऊस कविता
                   "आज मळभ आलीय दाटून "
                   -------------------------

आज मळभ आलीय दाटून
वरकरणी तसं राहिलंय वाटून
देणगी वरुणराजाची कृपा होऊन क्षणभराची,
देईल तो पावसाच्या थेंबांची.

सारे अंबर गेलंय झाकोळून
हवेनेही थंडीचे घेतलंय रूप
कृष्ण-मेघांची साखळी एकत्र गुंफून,
आज मळभ आलीय दाटून.

क्षितिजावर दाट होत पट्टा
तो दूरवर दिसतोय पसरून, विस्तारून
हालचाल नाही, स्तब्ध न्याहाळत,
आज मळभ आलीय दाटून.

वाटते, आता तरी लागेल कळ
तृषार्त धरणीस लागेल पर्जन्य-झळ
पण ढिम्म, निग्रही हे जलद,
वाकुल्या दाखविती, चिडविती आसमंतातून.

पक्षी कुजनाचे थांबलेत केव्हाचे
भरारताहेत अजूनही पंख पसरून
पण चाहूल काय, मागमूसही नाही,
प्राणी-मात्रही स्तब्ध होतंय राहून-राहून.

वारा आहे, तरी सळसळ नाही
फुले आहेत, परि दरवळ नाही
थेंबाच्या प्रतीक्षेत हि सृष्टी, हे चराचर,
त्याच्या एका दर्शनास राहिलेत थांबून.

आज ओढ आहे पावसाची मनाला
चिंब भिजविणाऱ्या त्या थेंबांची तनूला
मेघ दाटलेत, तरी गडगडाट नाही,
प्रतीक्षेत नकळत नयन गेलेत बरसून.

वेळ पूर्वेकडून निघालीय पश्चिमेला
पाऊले केव्हाच घराकडे परतलीत
आता निशाही पसरतेय अस्तीत्व दाखवून,
तरी अजुनी  मळभच राहिलीय दाटून. 

मेघचं आहेत नित्य पर्जन्याचा स्रोत
त्यांच्यावरच मदार असते पावसाची
ढग नाहीत, तर पाऊसही नाही,
विचार मनातले गेले, मनातच विरून.

सार बाजूस, मळभ-पटलं तनावरले
मोकळे कर, स्फटिक-जल तव अंतःकरणातले
सृष्टी जाईल वर्षावाने त्या आनंदून,
हे मेघा, तू  पाणी दे, ये धावून,
हे जलदा, तू जल दे, जा बरसून.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.06.2021-शनिवार.