पाऊस (ऊन) खेळ कविता- "आगळीच आलीय झळाळी उन्हास"

Started by Atul Kaviraje, June 30, 2021, 11:30:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज पुन्हा एकदा पावसाची कविता,नाही बरं ! आज मी उन्हाला चान्स दिला आहे. कवितेची कल्पना अशी की, आज म्हणजे दिनांक-३०.०६.२०२१, रोजी मी कामावरून घरी परतेपर्यंत चक्क उन्हाचाच दिवस होता. पावसाचे दूर दूर पर्यंत कुठेच नामो-निशाण नव्हते. उन्हाला आज चमकायची एक संधी प्राप्त झाली होती. एरव्ही पावसाच्या दिवसात ऊन दिसणे म्हणजे दुर्मिळच. पण आज उन्हाने बाजी मारली होती.

     या संधीचे ते म्हणजे ऊन सोने करून घेत आहे. ते आनंदाने एखाद्या लहान अल्लड मुलासारखे बागडतंय, नाचतंय, अगदी मनापासून. आज त्याचे राज्य आहे. आजचा सारीपाटाचा खेळ ऊन जिंकलंय. पण हेही उन्हाला समजतंय, की सारे क्षणिक आहे.  उद्या पुन्हा पटावरला खेळ पाऊसच जिंकणार आहे. पण ते निर्धास्त, बिनधास्त आहे आज. त्याला उद्याची चिंता नाहीय.

     पण अगदी मोठ्या मनानेही ते पावसाचे आभार मानतंय, की त्याला चमकायला एक संधी त्यानेच तर दिली आहे. ऐकुया तर या ऊन - पावसाच्या सारीपाटाच्या खेळातील एक ऊन ऊन कविता. कवितेचे शीर्षक आहे - "आगळीच आलीय झळाळी उन्हास"


                    पाऊस (ऊन) खेळ कविता
               "आगळीच आलीय झळाळी उन्हास"
             ---------------------------------   

ढगांतून तिरप्या नजरेने हळूच
ऊन चोरून डोकावून पहातंय
पावसाला सहजी शह देत, 
या खेळाचा सारीपाट जिंकतय.

दिवस पावसाचे, पाऊस येण्याचे
सर्वत्र पाणीच पाणी होण्याचे
डबक्याचे नावंच सोडा आज,
दुर्लभच झालंय दर्शन थेंबाचे.

ऊन पावसाच्या अजब खेळात
कधी ऊन, तर कधी पाऊस वरचढ
पण पावसाने दडी मारलीय केव्हाच,
म्हणूनच आलंय राज्य उन्हाचे तेव्हाच.

आगळीच आलीय उन्हास झळाळी
लखलखतंय,सुवर्णासम ते चकाकतंय
पिवळ्याधमक सोनेरी सतेज वर्खात,
सुवर्ण-कण, सुवर्ण-क्षण दैदिप्यमान साठवतंय.

वेगळाच पवित्रा घेतलाय उन्हाने
मनापासून हुंदडतय, बाल्य पावलाने
आज ते आनंदी,खुशीत दिसतंय,
धरेस साऱ्या जवळून न्याहाळतयं.

आज बुद्धीपटाच्या खेळात ते
पर्जन्यास सहजी मात देतंय
त्याचा डाव येईल तेव्हा पाहून घेईन,
म्हणतंय,आता मी माझीच खेळी खेळेन.

पावसाचे नाहीय नामो-निशाण कुठेच
उन्हाच्या ते पथ्यावरच पडतंय
नाही तर त्यास वाव कुठला हो ?
पावसाच्या गर्भात ते केव्हाच विरतंय !

पण आज आहे उन्हाचा दिवस
मनमानी करून घेतंय बिनधास्त
दिवसभर दौडून थकवा नाम-मात्र नाहीय,
आता थोड्याच वेळात होईलही दिन-मणी अस्त.

अंबरी उगवलेल्या ढगांत ते
शुभ्र, चंदेरी रूपात सजतंय
सारे आकाश टाकून व्यापून,
क्षितिजासही अनोखे रूप देतंय.

मिळालेल्या संधीचे सार्थक करून
ते हसतंय, खिदळतंय, खुशीत धावतंय
कदाचित उद्याचा दिन नसेल नशिबी,
उरी खंत न बाळगता, निर्धास्त बागडतंय.

क्षणिक का होईना आजच्या दिवसात
मला सोने व्हायची मिळालीय संधी
त्या सख्या, सवंगडी, मित्र पावसाचे,
ते मनापासून आभार मानतंय.

ऊन-पावसाच्या या अनोख्या खेळात
आजचा दिवस उन्हाचा आहे.
उद्या कदाचित येईल पावसाचे राज्य,
आजचे क्षण ते पाहून घेतंय.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.06.2021-बुधवार.