देव अस्तीत्व- कविता - " देव का देवळात आहे?"

Started by Atul Kaviraje, July 04, 2021, 12:48:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     देवाचा शोध घेण्यास मी निघालो असता, मला देव देवळात फक्त मूर्तिरूपात सापडला. पण अधिक शोध घेता मला असे जाणवले, की देव हा देउळी, राउळी नसून तो तुमच्यात आणि आमच्यातच आहे. तो आपणा सर्वांच्या मनात आहे. आणि आपल्याला ते माहीतही नसत. आपल्या अंतः करणात भरलेल्या या माणुसकीरुपी, प्रेमरूपी देवाला आपण कधीच पाहू शकत नाही, कधीच ओळखू  शकत नाही.

     पण त्याचे स्वरूप तेव्हा कळते, जेव्हा आपण एखाद्या संकटात अडकलेल्या जीवाला मदत करतो, एक माणुसकीचे रूप दाखवतो, तेव्हा तो हात जोडून आपणास सांगत असतो, की अगदी देवासारखेच धावून आलात. आपल्या कर्मात देव आहे, आपल्या धर्मात देव आहे. आपल्या  मधुर बोलण्यात देव आहे, आपल्या  प्रेमळ दृष्टीत देव आहे. कोठेही दूर जाण्याची गरज नाही, तो आपल्यातच आहे.

     तर अश्या या प्रत्येकात प्राणी-मात्रात देव पाहण्याची दृष्टी आपणात असावयास हवी. प्रस्तुत कविता मी अशीच देवाच्या अस्तित्त्वावर रचली आहे. कवितेचे शीर्षक आहे - "देव का देवळात आहे ?"





                                देव अस्तीत्व- कविता
                             " देव का देवळात आहे?"
                            ------------------------   

देव का देवळात आहे?
ईश्वर का राउळी पाहे?
तुझ्या मनाच्या पावन मंदिरातच,
पवित्र मूर्तीचे स्थान आहे.

     पाषाणाच्या साकारास आजवर भुलूनी
     हस्त दोन्ही जोडीत आलास
     निराकार,अमूर्त तुझ्या हृदयी,
     वात्सल्याचा झराच वहात आहे.

नजरतेल्या तुझ्या दयार्द्र  दृष्टीने
देवच जणू पहात आहे
मधुर वचनांनी तुझ्या मुखाने,
देवच जणू बोलत आहे.

     तुझ्याच ठाई वसलाय तो
     अंतरातच तुझ्या भरलाय तो
     प्रथम स्वतःसच ओळख तू,
     देव का देवळात आहे?

तुझ्या कर्मात देव आहे
तुझ्या धर्मात देव आहे
निखळ, निर्लेप गाभाऱ्यातून आलेल्या,
तुझ्या हसण्यात देव आहे.

     दीनांचा तू होऊन त्राता
     दुबळ्यांचा तू होऊन पालनकर्ता
     दाखवून दिलेस नाते आपुलकीचे,
     अमूर्त स्वरूप जणू देवाचे.

पंचमहाभूतांचे अस्तित्त्व तुझ्या शरीरात
शक्ती-स्रोत मनाचा, दैवी स्वरूपाचा
तुला काय आहे अशक्य,
माणूस राहूनच होईल शक्य.

     माणुसकीचे नाते जोडून सर्वांशी
     आपलेसे करून परक्यांसी,दुसऱ्यांसी
     दर्शनच घडलंय तुझ्या देवपणाचे,
     अंबर उजळलंय सत्यरूपी तेजाचे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.07.2021-रविवार.