जीवन - वास्तव-कविता- "प्रत्येक क्षण जगून घे !"

Started by Atul Kaviraje, July 05, 2021, 12:27:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     प्रस्तुत कवितेची संकल्पना अशी आहे कि, आपले जीवन हे क्षणभंगुर असते, अळवाच्या पानावरले विरणारे पाणी असते, सतत फुटणारी सागरी लाट असते, अश्या अनेक उपमा जीवनास देता येतील. सांगण्याचा मुद्दा हा की, या क्षणभंगुर जीवनाचा काय भरोसा, आज आहे तर उद्या नाही, त्यामुळे हा येणारा आणि जाणारा प्रत्येक क्षण आपण जगण्याचा प्रयत्न करूया.

     मृत्यू आपणावर कधी झेप घेईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे हे जीवन, त्यातील प्रत्येक क्षण कोणत्या पद्धतीने जगायचा हे आपल्याच हाती असते. अशी ही अनेक विशेषणांनी भरलेली जीवनाची व्याख्या मी माझ्या पुढील कवितेत विषद करण्याचा प्रयत्न  केला आहे. प्रस्तुत कवितेचे शीर्षक आहे - " प्रत्येक क्षण जगून घे !"

     
                            जीवन - वास्तव-कविता
                            "प्रत्येक क्षण जगून घे !"
                       -----------------------   

प्रत्येक क्षण जगून घे
प्रत्येक क्षण पाहून घे
उद्याचे कुणी काय सांगता,
आठवणीच राहातील वळून पहाता.

     सुख-दुःखाचे आहे काटयांनी भरलेले
     खडतर जीवनही सहून घे
     जीवनाचे आहेत रंग-ढंग न्यारे,
     आनंदाचे उमाळे, दुःखाचे सुस्कारे.

क्षणभंगुर जीवनाचा हा दंव-बिंदू
अळवावरच्या पानावरील गतिमान जल-बिंदू
पहाता-पहाता जाईल विरून,
जाईल तुज जगही विसरून.

     मृत्यूवर नियंत्रण नाही तुझे
     हक्क त्याचाच हिरावून घेण्याचे
     जोवर आहे, जगून घे,
     सुंदर फुलासम फुलून घे.

ईश्वराच्या हातातले बाहुले आपण
सोडून दे अहंभाव, मी-पण
सत्कर्म काहीतरी करून घे,
वर्म हेच जाणून घे.

     लाटांसम सागराच्या अपुले जीवन
     एक फुटता, दुसरीस नवं-जीवन
     लाटांच्या आनंद-लहरींवर तरंगून घे,
     प्रत्येक क्षण जगून घे.

वाट्यास सुखांपेक्षा दुःखेच जास्त
जाहली जरी स्वप्ने उद्ध्वस्त
दुःखातही सुखास पाहून घे,
प्रत्येक क्षण जगून घे.

     ज्या विध्याताने दिले जीवन
     ऋण या जन्मीच फिटू-दे
     त्या ईश्वराचे पावन नाम,
     हरक्षणी मुखी राहू दे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.07.2021-सोमवार.