मृत्यू ,एक कठोर सत्य - वास्तव-कविता-" केव्हावी पडेल मृत्यूची उडी !"

Started by Atul Kaviraje, July 08, 2021, 01:32:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यूही आहेच. हे निर्विवाद सत्य आहे. जगातील आज कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. आईच्या उदरातून जेव्हा मूल बाहेर येते, तेव्हाच त्याच्या वळलेल्या मुठीत तो आपल्या नशिबाबरोबरच, जीवनाची आणि मृत्यूचीही रेघ घेऊन येत असतो. मृत्यूला आजवर कोणीही जिंकू शकलेले नाही , तो अजेय आहे.

     तर असा हा कालरूपी दैत्य आपल्या जीवनावर केव्हाही घाला घालेल, त्या-आधीच आपण हे आपल्याला मिळालेले जीवन परिपूर्ण जगण्याचा, सार्थकी लावण्याचा ,अतिशय सुंदर रीत्या जगण्याचा प्रयत्न करावयास हवा. येणारा व जाणारा प्रत्येक क्षण जगावयास हवा. जीवनाकडे आपली पाहण्याची दृष्टी आपण आजच बदलूया. ते सार्थ करण्याचा प्रयत्न करूया.

     जीवन - मृत्यू या विषयावरील माझी ही प्रस्तुत कविता आहे. हे एक न चुकलेले व न चुकवता येणारे  कठोर सत्यच आहे. त्याला आपण निधड्या छातीने तोंड द्यावयास हवे. कवितेचे शीर्षक आहे - " केव्हाही पडेल मृत्यूची उडी !"


                   मृत्यू ,एक कठोर सत्य - वास्तव-कविता
                       " केव्हावी पडेल मृत्यूची उडी !"
                  ----------------------------------


बलवान निसर्गापुढे अस्तित्त्वच काय ?
क्रूर नियतीपुढे मूर्ती बापुडी
केव्हाही घेईल झेप काळ,
केव्हाही पडेल मृत्यूची उडी.

     जीवन ज्याला, मृत्यू त्याला
     अमरपट्टा घेऊन नाही जन्मला
     जीवन आहे प्रकाशमान सकाळ,
     मृत्यू आहे आयुष्याची संध्याकाळ.

जीवन आहे एक स्वप्न
पडलेले पहाटेस सुंदर, जागेपणी
मृत्यू एक कठोर सत्य,
अटळ, काळ-पुरुषरुपी,क्रूर दैत्य.

     आगाऊ सूचना देत कधीही
     मृत्यू नाही दिसत कधीही
     अगोचर असा हा सर्वशक्तिमान,
     मानव आहे त्याचा गुलाम.

अखंड जोडली आहे नाळ
त्या आकाशातील अनंत स्वरूपाशी
जाईल तोडला दुवा तात्काळ,
मृत्यू जेव्हा करील रक्त-बंबाळ.

     स्थळ नाही, वेळ नाही
     गगन नाही, धरा नाही
     मृत्यूस पुरून उरेल असा,
     कोणी उणा पुरा नाही.

झाकोळून टाकेल अंबर कृष्ण-मेघांनी
करील स्वाहा लवलवत्या ज्वाळांनी
तांडव, थयथयाट मृत्यूचा विक्राळ,
अंत जीवनाचा घडवील तात्काळ.

     आजचे जीवन जगून घ्यावे
     प्रत्येक क्षण पाहून घ्यावा
     उद्याचा दिवस पाहिलाय कुणी,
     झेप घेईल मृत्यू तत्क्षणी.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.07.2021-गुरुवार.