नवल कविता - "महिला घेती मासिक पगार, ऐकून पुरुष झालायं गार !"

Started by Atul Kaviraje, July 09, 2021, 11:43:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     सरकार नवनवीन योजना दरसाल राबवतंय. जन-हिताच्या दृष्टीने या योजनांचे दरवर्षी नव्याने येणे होते,त्या नव्याने दाखल होतात. परंतु त्या खरोखर राबविल्या  जातात का ? कि फक्त त्या कागदोपत्रीच असतात, कागदावरच घोड्यांच्या रूपांत नाचविल्या जातात ? सरकार दप्तरी या योजनांची नोंद असते, परंतु त्या प्रत्यक्षात येतात का, हे एक मोठे कोडे आहे. त्यातीलच ही एक योजना महिलांच्या हिताची होती. काही दिवसांपूर्वीच बातमी होती, की सरकार घरगुती महिलांना म्हणजे नोकरी न करणाऱ्या महिलांना मासिक वेतन सुरु करणार आहे. त्यांना घर-बसल्या चक्क पगार मिळणार आहे.

          त्यांच्या श्रमाचे सार्थक व्हावे, ज्या घरासाठी त्या आपले सर्व काही पणाला लावतात , घर जोडतात, घरातील सर्व कामे रात्रं दिवस मेहनतीने, खपून करतात, ती नोकरी नाही तर काय ?म्हणून त्यांना एकार्थी स्व-बळावर, स्वतःच्या पायावर उभे राहण्यास, एक मदत म्हणून सरकारने ही त्यांच्या हिताची योजना राबविण्याचे ठरविले आहे. परंतु वर सांगितल्याप्रमाणे, ही योजना प्रत्यक्ष अस्तित्त्वात येईल का ? त्याचे पालन होईल का ? स्त्रियांना मासिक वेतन खरंच मिळेल का ? त्यांना दिलासा मिळेल का ? अर्थात हा पुढचा प्रश्न आहे, त्याबद्दल आताच उहापोह करायची गरज नाही.

     हे आणखी एक नवल नाहीतर काय ? या सरकारच्या होऊ घातलेल्या अभिनव, अनोख्या योजनेवर एक कविता प्रस्तुत करीत आहे. सरकारच्या या नवीन योजनेने, महिलांना तर दिलासा मिळालाच , कदाचित माझी ही  महिला-भीमुख कविता वाचून त्यांना अधिक दिलासा मिळेल, ही कल्पना मनात योजून मी ही कविता आपणास ऐकवीत आहे. ऐकुया तर ही नवीन योजनेची महिलांना दिलासा देणारी, मासिक पगाराची, अभिनव नवल कविता. कवितेचे शीर्षक आहे - "महिला घेती मासिक पगार, ऐकून पुरुष झालायं गार !"

                                           नवल कविता

                                 घरगुती महिलांना मासिक वेतन
                   "महिला घेती मासिक पगार, ऐकून पुरुष झालायं गार !"   
                --------------------------------------------------

अभिनव अनोखी, पुन्हा एकवार
योजना आखतंय सरकार, वारंवार
जन-हिताचे त्याला, कोणीतरी केव्हातरी,
उपदेशाचे डोस पाजलेत वारंवार.

अधिकाराचे महिलांचे आलंय युग
दिवस गेलेत दळायचे, जात्यावर मूग
आता जातेही गेलंय, आणि खुंटाही तुटला,
भाव आलाय आज चक्कीच्या पिठाला.

थोडक्यात, महिलांना हवंय स्वातंत्र्य
पुरुषांच्या बरोबरीने त्यांनाही हवाय हक्क
मागण्या मागितल्यात त्यांनी सरकारकडे,
देण्यात यावा आम्हा पगार, चक्क.

राब-राब राबतेय ती घरासाठी
आणिक घराच्या भिंती एकसंध जोडण्यासाठी
महिलांचेच आहे अथक परिश्रम यापाठी,
मुला -बाळांचं करण्यातच उलटलीय त्यांची साठी.

पुरुषांनीच नोकरी करून कमवायचे पैसे
आम्हीही नाही आहोत काही ऐसे-तैसे
त्यांच्या जोडीने आम्हीही घेतोय मेहनत,
आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यावे, कैसे.

फुल ना  फुलाची देऊन पाकळी
भरावी आमच्या जीवनातील पोकळी
एक-जूट, एक-संध होऊन ही गृह-साखळी,
जीवनास येईल मग गती आगळी.

सरकारही नमलय त्यांच्या मागण्यांपुढे
अधिकार त्यांना देण्यास सरसावलंय पुढे
बोलून त्यांनी मनातल्या भावना दाखविल्यात,
सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यात.

आज सर्व महिला खूष आहेत
खात्यात त्यांच्या पैसे जमा होताहेत
आपला अधिकार जाणलाय या सरकारने,
महिला  सरकारचे आभार मानत आहेत.

हात पसरावा नाही लागत नवऱ्यापुढे
वाचावे लागत नाहीत तेच ते बे-चे पाढे
कनवटी तिची आज खुळखुळते आहे,
ती आज हवे ते हक्काने मिळवते आहे.

आदर्श माता,आदर्श गृहिणीचा तिचा रोल
यापुढेही ती प्रेमानेच,आपलेपणाने करेल
आपली असण्याची जाणीव ठेवूनच ती,
या अधिकाराने कधीही ऊतेल ना मातेल.

ही फक्त तिने एक झलकच दाखवली होती
तिला फक्त हवी आहे नाती अन आपल्यांची प्रीती
पैसा काय आज आहे, उद्या नसेलही,
पण तिचा हात यापुढेही घरभर फिरेलही.

तिला समाजात आज स्थान आहे
घरीही तिचा होत सन्मान आहे
तिला मासिक वेतनापेक्षाही प्रिय, जवळचे,
आपल्या लोकांचेच जास्त भान आहे. 


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.07.2021-शुक्रवार.