जीवन - संघर्ष कविता - "पहा खेळताना वेळ ,खेळा बुद्धिबळाचा खेळ !"

Started by Atul Kaviraje, July 11, 2021, 11:32:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     तुम्ही बुद्धिबळाचा खेळ पहिला असेलच आणि खेळलाही असेलच. पटावरील ६४ प्यादी, ही चुरशीने ३२ आणि ३२ या संख्यने एकमेकांशी , एकमेकांविरुद्ध खेळत असतात, शह आणि मात देत असतात, आणि घेतही असतात. तुम्हाला एक, वेळेचे घड्याळ ही बाजूस ठेवलेलं आढळेल, त्या वेळेच्या आतच ती प्याद्यांची  विशिष्ट खेळी ही खेळाडू खेळत असतो, थोडक्यात या खेळात बुद्धी-बरोबरच वेळेचेही भान दोन्ही खेळाडूंना ठेवावे लागते, आणि त्यानुसारच खेळावे लागते.

     पुढे जाऊन मी असाही विचार करतो, आणि या बुद्धिबळाच्या खेळाची आणि वेळेची सांगड आपल्या जीवनाशी घालू लागतो. जीवनात स्पर्धा ही नेहमीच सुरु असते, अगदी प्रत्येक बाबतीत. वेळेची मर्यादा ही आपल्याला जगताना पाळावी लागते. त्या घडाळ्याच्या काट्यांबरोबर आपलेही जीवन अथक पळत असते, व या बुद्धिबळासारखी शह - मात एकमेकांना देऊन ही जीवन स्पर्धा जिंकावी लागते. कधी कधी आपल्या जीवनात हारही येते, पण तीही मोठ्या मनाने आपणास स्वीकारावी लागते.   

     उपरोक्त विषयावर मी घड्याळाप्रमाणेच अथक धावणाऱ्या जीवनाची, आणि बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे जीवनात येणारी हार आणि जीत यावर कविता रचली आहे. सर्वांनाच या दोन्ही गोष्टींचा जीवनात अगदी प्रकर्षाने, यथार्थ अनुभव आला असेलच. मित्रानो, असेच असते आपले जीवन. माझ्या कवितेचे शीर्षक आहे- "पहा खेळताना वेळ ,खेळा बुद्धिबळाचा खेळ !"

                          जीवन - संघर्ष कविता

           "पहा खेळताना वेळ ,खेळा बुद्धिबळाचा खेळ !"
        ---------------------------------------------


बुद्धिबळाचा खेळ, जणू बुद्धीचाच खेळ
पटावरल्या ६४ घरांचा नेहमीच असतो मेळ
एकमेका धरून ती जोडलेली असतात,
कृष्ण-धवलांच्या साखळीत गुंफली जातात.

या ३२ घरातून, समोरील ३२ घरात मुक्त
प्यादी इथून, तिथे सरकत असतात
फौजफाटा घेऊन राजे  पटावरले,
शह-मातेस सरसावलेले असतात.

या बुद्धिमान खेळाच्या दोऱ्या असती 
त्या बुद्धिमान चतुर माणसा हाती
पटावरील  कळसूत्री बाहुल्याना मनाप्रमाणे,
ते पुढे मागे कसे सरकविती.

प्रतिस्पर्ध्याचा डाव घेऊन लक्षात
आधीच खेळी खेळली जाते
समोरच्या हालचालींवर ठेवून नजर,
पटावरली प्यादी हलवली जाते.

पण या बुद्धिमान खेळासही कधी
वेळेच्या बंधनात बांधले जाते
स्पर्धा परीक्षा बुद्धिबळाच्या घेताना,
हि वेळच मुख्यत्त्वे पाळली जाते.

खेळी खेळताना पटावरील बुद्धिबळाच्या
दोन्ही डोकी विचार करीत असतात
सोबत बाजूकडील वेळेच्या घड्याळाचेही,
ते तेव्हढेच भान ठेवीत असतात.

वेळेची मर्यादा पाळावीच लागते
जीवनातही ती काटेकोर असते
तास काटा, सेकंड काट्यांबरोबरच त्याच्या,
आपले जीवनही धावत असते.

नियमानुसार बुद्धिबळाच्या लागू होते
खेळाडूंना वेळेचे बंधन पाळावे लागते
अमुक वेळेत पुढली तमुक खेळी,
हि त्यांना खेळावीच लागते.

विचारांच्या गतीपुढेही जाऊन वेगाने
त्यांचे हातही चालत असतात
भराभर प्रतिस्पर्ध्याच्या शह - मात देत,
ते लढाई जिंकण्याच्या तयारीत असतात.

घड्याळ म्हणते, थांबू  नका, खेळत राहा
माझी मर्यादा पाळत राहा
जिंकण्याची आस मनी ठेवून,
तुम्ही सतत पळत राहा.

माझ्या गतीने जो धावेल
तोच जीवनाची स्पर्धा जिंकेल
पळता पळता जो थांबेल,
तो या खेळाची बाजी हरेल.

जीवनाच्या या बुद्धिपटांत आपण
अथक खेळी खेळत असतो
वेळेचेही नियमित भान राखून,
स्व-कौशल्याने ती जिंकत असतो.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.07.2021-रविवार.