पाऊस कविता - "पाऊस नुसता बोलतच आहे."

Started by Atul Kaviraje, July 16, 2021, 11:45:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज, म्हणजे दिनांक-१६.०७.२०२१-शुक्रवार ,पाऊस खऱ्या अर्थाने इथे मुंबईत, ठाण्यात सुरु झालेला आहे. छान पडतोय, खूप उत्साही वाटतंय, मनाचे समाधान होतंय, मन प्रसन्न होतंय. आपल्याला इतकं वाटत, तर प्रत्यक्ष त्या पडणाऱ्या पावसाला काय वाटत असेल, याच मनात विचार आला.

     माझ्या प्रस्तुत कवितेत, "पाऊस नुसता बोलतच आहे", मी पावसाचे मनोगत, माझ्या शब्दांत  तुम्हांपुढे मांडत आहे. बऱ्याच दिवसानंतर त्याला पडायची, मनापासून बरसण्याची एक संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे तो आनंदी आहे, खुश आहे, त्याने आपल्या पडण्याबरोबर, मनालाही वाट मोकळी करून दिली आहे, मनातील गुपिते, गुह्ये तो आज सांगत आहे, तो निरंतर, सतत बोलत आहे, कुणाचेही ऐकून घेत नाहीय, फक्त त्याचीच रिपरिप सुरु आहे.

     त्याच्या भावनांना जणू काही आज पूरच आला आहे, इतकं तो खूप काही त्याच्या येण्यातून सांगत आहे. मनातल्या भावनांना असं बोलून दाखविल्यामुळे त्याला हलकं हलकं वाटू लागलं आहे. माझं मनही त्याच्याशी संवाद साधू लागलं आहे. त्याला समजून घेऊ लागलं आहे. त्याच्यासह गाणे गुणगुणू लागलं आहे. असो, ऐकुया तर पावसाची ही भावनोत्कट कविता. कवितेचे शीर्षक आहे - "पाऊस नुसता बोलतच आहे."


                          पाऊस कविता
                  "पाऊस नुसता बोलतच आहे."
                 ---------------------------
     

पाऊस आज आनंदी आहे
पाऊस आज खुश आहे
पाऊस आज उत्साही आहे,
पाऊस आज प्रफ्फुलीत आहे.

पाऊस नुसता बोलतच आहे
पाऊस काहीतरी सांगत आहे
मनातले साचलेले सर्व-सर्व काही,
धारा-प्रवाही निरंतर वदत आहे.

मनात साठवलेले आजवरचे गुह्य
तो एक-एक उलगडत आहे
दडलेली गुपिते मज सांगीत,
मन मोकळे करीत आहे.

खूप सांगायचंय त्याला आज
खूप काही बोलायचंय आज
मनातल्या भावनांना पूर येऊन,
साठवण रीती करीत आहे.

प्रत्येक थेंबातुन येऊन तो
शब्दात साकार होत आहे
मनसोक्त भिजवीत मला तो,
माझ्याशी संवाद साधत आहे.

पाऊस आज मुक्त आहे
पाऊस आज स्वैर आहे
अवखळ वाऱ्याचा हात घेऊन,
तो निरागस बागडत आहे.

त्याला कुणाचे ऐकायचे नाही
माझे तर मुळीच नाही
एरव्ही वाचाळ इतका मी,
त्याला शांत ऐकतो आहे.

पाऊस गाणे गातच आहे
अखंड तराणे सुरूच आहे
त्याचा संगीतातील लागलेला सूर,
मी कानात साठवीत आहे.

सर्व चराचर शांत आहे
सारे प्राणिमात्र अचल आहेत
भान विसरून सृष्टी सुद्धा,   
पावसाचा आदर करीत आहे.

आज पावसाचा दिवस आहे
जलधारांनी तृप्त करीत आहे
मनासारखे बरसून आज तो,
स्वतःच समाधानी होत आहे.

तो अजूनही बोलतच आहे
अखंड, अविरत, सतत, निरंतर
आज तो हवाहवासा वाटतोय,
त्याची कहाणी आवडत आहे.

असाच तू नित्य यावास
असाच तू नेहमी बरसावास   
भावनांना वाट करून देत
असाच तू मोकळा व्हावास,
     असाच तू बोलत रहावास.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.07.2021-शुक्रवार.