प्रेम कविता - "ऐक माझी प्रेमाची हाक, प्रतीक्षेत उभी मिळण्या साद"

Started by Atul Kaviraje, July 16, 2021, 05:17:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     या प्रस्तुत प्रेम-कवितेतील प्रेयसी आपल्या प्रियकराचे मन, त्याचे लक्ष्य आपल्याकडे वळावे, त्याने एकदा तरी आपल्याकडे पाहावे, म्हणून काय काय प्रयत्न करतेय, याचे मी बारकाईने चित्रण केले आहे. नटून - थटून , सारा साज-शृंगार करून, आपल्या अदांनी, हाव-भावांनी, प्रसंगी नर्तन करून, त्यास मोहित करण्याचा तिचा जो निष्फळ प्रयत्न  चालला आहे, ते पाहून मला तिची अत्यंत दया येत आहे. एवढे सर्व होऊनही, तिचा तो प्रियकर तिला ढुंकूनही पाहत नाहीय. किंबहुना त्याच्या ते गावीही नसावे. त्याचे तिच्याकडे दुर्लक्षच होत आहे.

     मित्रानो, या प्रेयसीच प्रेम - मागण तिच्या प्रियकराला काही कळत नाही आहे, त्यामुळे तिचे हे भाव-विव्हल मन त्याच्या प्रेमाची अशी मागणी करीत आहे.  पण, मला माहित आहे मित्रानो, कि तिचा  हा प्रयत्न कामी येऊन, अंती तिचे प्रेमच जिंकणार आहे, व तिचा प्रियकर तिच्या प्रेमाच्या हाकेला अंतरातून साद देणार आहे. ऐकुया तर या प्रेयसीचे प्रेम - मागण , प्रेम- कवितेच्या रूपात. कवितेचे शीर्षक आहे - "ऐक माझी  प्रेमाची हाक, प्रतीक्षेत उभी मिळण्या साद"


                             प्रेम कविता
    "ऐक माझी  प्रेमाची हाक, प्रतीक्षेत उभी मिळण्या साद"
   ------------------------------------------------


डोळ्यांतले आश्चर्य तुझे नारी
भासतेय कुणा विनवी परोपरी
साद तुझ्या प्रेमाची हवीय तुला,
तू एक लोभस प्रेम-सुंदरी.

हावभाव  तुझे ,दिसती  नाना  परि
रिझविण्या मन , पाऊले पदन्यास करी
प्रेमाची आस आहे तुज खरी जरी,
पाहिलं का प्रियकर तुज वळून तरी?

दिलखेच अदा ,मोहित करण्या तयारी
तुझी दिसतेय मनातून खरी -खुरी
पण त्याला काय पडलेय याचे?
कोसळल्या जरी सरींवर सरी,कितीतरी!

उत्कंठा नयनी तुझ्या परी
प्रियकरास नच कळे ग सत्त्वरी
का ग तू एवढा शृंगार करी?
वृथा ग चालल्या तुझ्या नाना परि.

हताश नको होऊस अशी ,अगं नारी
प्रेम दिसून येउ दे तुझे अंतरी   
जीत होईल खऱ्या प्रेमाची तुझ्या,
प्रेमळ नजर पडेल प्रियकराची तुजवरी .


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.07.2021-शुक्रवार.